|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सावरकरी विचारांकडे दुर्लक्ष केल्याने देशाचे मोठे नुकसानसावरकरी विचारांकडे दुर्लक्ष केल्याने देशाचे मोठे नुकसान 

IMG_0540

प्रतिनिधी/ कोल्हापूर

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांकडे टीकाकारांनी कधीही दोन्ही डोळय़ांनी पाहिले नाही. उलट त्यांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाकडे दुर्लक्ष करत अहिंसेचे चुकीचे तत्वज्ञान स्वीकारले. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले. चार्तुवर्ण्य नष्ट करण्याच्या चळवळीत डॉ. आंबेडकरांइतकेच सावरकरांचेही योगदान होते, म्हणूनच त्यांना ‘भारतरत्न’ मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन पतीत पावन संघटनेचे प्रांत अध्यक्ष सोपानराव देशमुख यांनी केले.

पतीत पावन संघटनेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शाहू स्मारक भवनात रविवारी सायंकाळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : असामान्य व्यक्तिमत्व’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे संपर्कप्रमुख सीताराम खाडे होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपजिल्हाध्यक्ष आकाश नवरूखे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई उपस्थित हेते.

देशमुख म्हणाले, सावरकरांना टीकाकारांनी एकाच नजरेतून पाहिले. त्यामुळे त्यांच्याविषयी समाजात गैरसमज निर्माण केले गेले. टीकाकारांनी त्यांच्या कार्याकडे दोन्ही बाजूंनी पाहिल्यास सत्य समोर येईल. स्वातंत्र्यपुर्व काळात अनेक वर्षे तुरूंगात काढून देखील स्वातंत्र्यानंतर त्यांचा अपेक्षित असा यथोचित सन्मान झाला नाही. या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान बनण्याची पात्रता सावरकर यांच्यात होती. अशावेळी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हा महापुरूष अनेक वेळेला तुरूंगवासाचा धनी होतो, ही नियतीची वक्रगती असल्याचे त्यांनी सांगितले.

सावरकरांचे सैनिकीकरणाचे धोरण आम्ही नाकारले, तर अहिंसेचे चुकीचे तत्वज्ञान अंगिकारून देशाचे प्रचंड नुकसान केले. बदलत्या काळात समोर येणाऱया समस्या सोडवताना भविष्यात सावरकरी विचारांचाच आधार देशाला घ्यावा लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चार्तुवर्ण्य नष्ट करण्याच्या चळवळीत डॉ. आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले योगदान हा देश कधीही विसरणार नाही. चार्तुवर्ण्य नष्ट झाल्यानंतर भारत खऱया अर्थाने उभा राहू शकेल, हा विश्वास सावरकरांना होता, म्हणूनच त्यांनी या चळवळीत बहुजन समाजाला समाविष्ट करून घेतले होते. म्हणूनच सावरकर हे क्रांतीचे अग्रदुत होते. सावरकरांचे सकारात्मक हिंदूत्व आम्ही कधी पाहिले नाही. देशाच्या विरोधात जो कोणी असेल त्याला पतीत पावन संघटना विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.

सुनील पाटील म्हणाले, पतीत पावन संघटनेने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. कोल्हापुरात ती राबवली जाणार असल्याचे सांगितले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे ऍड. विक्रम घाटगे, ऐश्वर्या नाईक, सीताराम खाडे, संदीप देसाई यांची भाषणे झाली. सुनील पाटील यांनी स्वागत केले. आकाश निरूखे यांनी आभार मानले. यावेळी अशोक देसाई, नाझरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: