|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डॉ. मार्सेलिन आल्मेडा यांना राष्ट्रीय ‘तरुमित्र’ पुरस्कार

डॉ. मार्सेलिन आल्मेडा यांना राष्ट्रीय ‘तरुमित्र’ पुरस्कार 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मार्सेलिन आल्मेडा यांना वनस्पती संशोधन आणि संवर्धन या क्षेत्रात बजावलेल्या  कामगिरीबद्दल त्यांना भारतातील वनस्पती संशोधन व संवर्धनात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘तरुमित्र’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नॅशनल सोसायटी ऑफ प्रेंडस् ऑफ ट्रिज या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जात असून मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यापूर्वी ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते मोहन धारिया यांना देशातील वनराई प्रकल्पांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता. प्रोफेसर डॉ. आल्मेडा हे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे दुसरे मानकरी ठरले आहेत.

डॉ. आल्मेडा हे सावंतवाडीचे सुपुत्र असून वनस्पती संशोधनातील भीष्माचार्य म्हणून त्यांना संपूर्ण देशभरात ओळखले जाते. त्यांनी वनस्पती संशोधनात केलेली कामगिरी खरोखरच अद्वितीय म्हणून ओळखली जाते. यापूर्वीही त्यांना अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड ऍन्ड सेन्च्युरी मॅगझिनकडून दिला गेलेला ‘ग्रीन टिचर’ पुरस्कार, टेस्कोनॉमिस असोसिएशन ऑफ इंडियाकडून रेव्हलंट फादर एन्ड शांतापाव मेमोरियल गोल्ड मेडल, रोटरी क्लब ऑफ मुंबईतर्फे देण्यात आलेला ‘मुंबई गौरव’ पुरस्कार, भारतीय मराठी फिल्म वितरक संस्थेतर्फे देण्यात आलेला वसुंधरा पुरस्कार, अहमदनगर येथील भारतीय तोफखाना विभागातर्फे प्रधान केलेली शिल्ड, डी. आर. सी. स्थित महाराष्ट्र ऍकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्याकडून प्रदान करण्यात आलेली एफ. एम. ए. एस. सी. ही प्रतिष्ठेची फेलोशिप व मुंबई विद्यापीठाची अत्यंत सन्मानाची म्हणून ओळखली जाणारी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त झाली आहे. वरील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांव्यतिरिक्त डॉ. आल्मेडा यांना कित्येक छोटे-मोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या या ‘तरुमित्र’ पुरस्काराबद्दल संपूर्ण जिल्हय़ातून त्यांचे अभिनंदन होत आहे. 22 फेब्रुवारी रोजी त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

Related posts: