|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळच्या ‘कचरा डंपिंग’वर तात्पुरता पडदा

कुडाळच्या ‘कचरा डंपिंग’वर तात्पुरता पडदा 

कुडाळ  कुडाळ शहरातील कचरा डंपिंग डेपोप्रकरणी लक्ष्मीवाडी व काळपवाडी नागरिक आणि कुडाळ नगर पंचायतीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी शनिवारी यशस्वी तोडगा काढला. पर्यायी जागा मिळेपर्यंत पूर्वीच्या जागी कचरा टाकण्यास नागरिकांनी प्रशासनास सहमती दिली. एक महिन्यानंतर त्या जागी कचरा टाकणार नाही, असे पत्रच ढेकळे यांनी नागरिकांना दिले. त्यामुळे या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला आहे. दरम्यान, दुपारपासून नगरपंचायतीने शहरातील कचरा भरण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्यानंतर सन्मानपूर्वक तोडगा निघाला. शनिवारी नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

गेले पाच दिवस येथील महापुरुष मंदिरालगत कचरा टाकण्यास नागरिकांनी विरोध करून आंदोलन सुरू केले होते. चार दिवस शहरातील कचरा भरलाच  न गेल्याने रस्त्यावर कचरा पसरला होता. दुर्गंधीला सुरुवात झाली होती. मात्र, नागरिक व ढेकळे यांनी यशस्वी चर्चा करीत या आंदोलनामुळे शहरवासीयांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली.

सकाळी नागरिकांसमवेत मुख्याधिकारी ढेकळे यांची चर्चा झाली. नगरसेवक सचिन काळप तसेच सत्यवान कांबळी, अनिल कुलकर्णी, सदा अणावकर, संजय बोभाटे, प्रभाकर चव्हाण, प्रकाश पाटणकर, राजन काळप, हर्षद काळप व अन्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

         मंदिरालगतचा कचरा काढावा

कचरा डेपोतील बराच कचरा मंदिराच्या जवळ आला आहे. तो कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढून दूर टाकत मंदिर परिसर स्वच्छ करावा. कचऱयाला जी  आग लावली जाते, ती लावली जाणार नाही, याची काळजी घ्यावी व आग लावली, तर ती तात्काळ विझवावी. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी, यासह अन्य मागण्या नागरिकांनी केल्या. ढेकळे यांनी त्या मान्य केल्या.

          नगर पंचायतीमार्फत कचऱयासाठी पर्यायी जागा

नगरपंचायतीच्यावतीने ढेकळे यांनी आंदोलनकर्त्या नागरिकांना पत्र देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. एका महिन्यात नगर पंचायतीमार्फत कचऱयासाठी पर्यायी जागा शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. या कालावधीनंतर येथे कचरा टाकला जाणार नाही, असे त्या पत्रात नमूद केले आहे. चर्चेवेळीही ढेकळे यांनी एक महिन्यानंतर येथे कचरा टाकणार नाही, असे स्पष्ट केले. आता कचरा टाकताना खड्डा खणून आत टाकला जावा, असे नागरिकांनी सांगितले. कचरा खड्डा खोदूनच टाकला जाईल. मात्र, जेसीबी उपलब्ध होईपर्यंत कचरा येथे आल्यास कचरा बाजूला डंप केला जाईल. खड्डा खोदल्यानंतर तो आत टाकला जाईल, असे ढेकळे यांनी सांगितले. त्यांनी चांगल्या पद्धतीने हा प्रश्न सोडविल्याने नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले.

 

Related posts: