|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » न्यूझीलंडविरुद्ध बांगलादेशचा ‘व्हॉईटवॉश’

न्यूझीलंडविरुद्ध बांगलादेशचा ‘व्हॉईटवॉश’ 

तिसऱया वनडेतही किवीज संघ 8 गडी राखून विजयी, मालिकेवर 3-0 फरकाने कब्जा

वृत्तसंस्था/ नेल्सन

सॅन्टनेर, जीतेन पटेलचे प्रत्येकी 2 बळी व केन विल्यम्सन (नाबाद 95), नील ब्रूम (97) यांच्या धुवांधार अर्धशतकाच्या बळावर यजमान न्यूझीलंड संघाने शनिवारी बांगलादेश संघाचा तिसऱया वनडेत 8 गडय़ांनी धुव्वा उडवत 3-0 अशा फरकाने ‘व्हॉईटवॉश’ही संपादन केला. या तिसऱया व शेवटच्या वनडेत बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 236 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 41.2 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यातच 239 धावांसह धमाकेदार विजयावर शिक्कामोर्तब केले. केन विल्यम्सन सामनावीर ठरला.

सॅक्स्टन ओव्हल येथे खेळवल्या गेलेल्या या लढतीत विजयासाठी 237 धावांचे आव्हान असताना यजमान न्यूझीलंड संघाची खराब सुरुवात झाली. मार्टिन गुप्टीलला 6 धावांवर दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले तर टॉम लॅथम अवघ्या 4 धावांवर मुस्तफिजूर रेहमानचा बळी ठरला. रेहमानने त्याला पायचीत करत त्याची खेळी क्षणभंगूर ठरवली. हे दोघेही अव्वल सलामीवीर परतले, त्यावेळी न्यूझीलंडसमोर चिंता होती. मात्र, तेथेच कर्णधार विल्यम्सन व ब्रूम ही जोडी जमली आणि त्यानंतर यजमान संघाला मागे वळून पाहावे लागले नाही.

विल्यम्सन व ब्रूम या जोडीने खराब चेंडूबरोबरच उत्तम चेंडूंचाही तितकाच समाचार घेतला. एकीकडे, विल्यम्सनने 116 चेंडूत 9 चौकार, 1 षटकारासह नाबाद 95 धावा जमवल्या तर दुसरीकडे, ब्रूमने चेंडूमागे एकेरी धाव, या समीकरणाने 97 चेंडूत 97 धावांचे योगदान दिले. शतक अवघ्या 3 धावांनी हुकले असले तरी त्याच्या खेळीत 12 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. संघाच्या खात्यावर 10 धावा असताना लॅथम तंबूत परतला तर गुप्टीलला दुखापतीमुळे बाहेर यावे लागले, त्यावेळी न्यूझीलंडच्या खात्यावर 16 धावा होत्या. त्यानंतर विल्यम्सन व ब्रूम या जोडीने तब्बल 179 धावांची भागीदारी साकारत न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठय़ावर आणून पोहोचवले.

मुस्तफिजूर रहमानने ब्रूमला 97 धावांवर मश्रफे मोर्तझाकडे झेल देणे भाग पाडले. पण, तोवर बराच उशीर झाला होता. ब्रूम 34 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्यावेळी न्यूझीलंडला आणखी फक्त 42 धावांची गरज होती. पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या नीशमने 23 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 28 धावांचे योगदान दिले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी येथे अवांतर 9 धावा दिल्या.

यजमान किवीज संघाने अखेर 41.2 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यातच विजय संपादन केला आणि या 3 सामन्यांच्या मालिकेवर 3-0 असा कब्जा केला. बांगलादेशतर्फे मुस्तफिजूरने 9.2 षटकात 32 धावात 2 बळी घेतले तर त्याच्याशिवाय, 7 गोलंदाजांची पाटी पूर्णपणे कोरी राहिली.

इक्बाल-कायेसची शतकी भागीदारी व्यर्थ

प्रारंभी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया बांगलादेश संघातर्फे तमिम इक्बाल (59) व इमरुल कायेस (44) यांनी 21.2 षटकात 102 धावांची तडाखेबंद सलामी दिली. मात्र, यानंतरही निर्धारित 50 षटकात त्यांना 9 बाद 236 या किरकोळ धावसंख्येवरच समाधान मानावे लागले. कायेस 22 व्या षटकात बाद झाल्यानंतर पुढील 9 षटकात केवळ 39 धावा जमवता आल्या, हे देखील बांगलादेशचे मोठे अपयश ठरले.

उभय संघात आता 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून त्यातील पहिली लढत दि. 3 जानेवारी रोजी नेपियर येथे होईल.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : 50 षटकात 9/236 (तमिम इक्बाल 88 चेंडूत 5 चौकारांसह 59, इमरुल कायेस 62 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 44, नुरुल हसन 39 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 44 धावा. अवांतर 17. मॅट हेन्री 2/53, मिशेल सॅन्टनेर 2/38).

न्यूझीलंड : 41.2 षटकात 2/239 (केन विल्यम्सन 116 चेंडूत 9 चौकार, 1 षटकारासह 95, नील ब्रूम 97 चेंडूत 12 चौकार, 1 षटकारासह 97, नीशम नाबाद 28. अवांतर 9. मुस्तफिजूर रहमान 9.2 षटकात 32 धावात 2 बळी).