|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अतिरिक्त शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भरवली शाळा

अतिरिक्त शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भरवली शाळा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आणि समायोजन त्वरित करावे, या आणि अन्य मागण्यांसाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने सोमवारपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शनिवारी या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शाळा भरवून अभिनव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून अतिरिक्त शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी आंदोलकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शाळा भरवली होती. यावेळी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, हमे इतनी शक्ती तु देना दाता ही प्रार्थना घेवून परिपाठ घेण्यात आला. त्यानंतर अतिरिक्त शिक्षक संतोष आयरे यांनी, विषय – संचमान्यता, घटक – अतिरिक्त शिक्षक यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनबाबतीत होणारे हाल, रोखलेल्या वेतनामुळे निर्माण होणाऱया आर्थिक अडचणी या मुद्यांवर सविस्तर अध्यापन केले. त्यानंतर बैठे व्यायाम प्रकार घेण्यात आले. संजय कुंभार यांनी, कार्यानुभव या विषयात कागदी टोपी तयार करणे हे प्रात्यक्षिक करून घेतले. एस.डी. पाटील यांनी, बोधकथेचे सादरीकरण केले. श्री. थोरात यांनी, संतांची शिकवण यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर भरवण्यात आलेली शाळा पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शिक्षण उपसंचालक एम.के.गोंधळी यांच्याशी चर्चा केली असता अतिरिक्त शिक्षक समायोजन व वेतन याबाबतचा आदेश तयार झाला असून आयुक्तांची सही होणे बाकी आहे, असे सांगितले. यावर सर्व आंदोलकांनी जोपर्यंत लेखी आदेश प्राप्त होत नाहीत. तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहिल, असे स्पष्ट केले. या आंदोलनात विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, राज्य शिक्षकेतर प्रमुख एम.डी.पाटील, राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, धनाजी पाटील, सावजी पाटील, वसंत पाटील, अशोक परीट, मारुती पाटील, बाजीराव पाटील, सदानंद कुंभार, संपत चव्हाण, शोभाताई पाटील, वंदना कोळी, मारुती कांबळे, मेघा मोरे, भाग्यश्री दराडे, आदींनी सहभाग घेतला.