|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पीडितांना ‘माहेश्वरी’कडून मायेची ऊब

पीडितांना ‘माहेश्वरी’कडून मायेची ऊब 

प्रतिनिधी/ सातारा

सुमारे 14 वर्षांपुर्वी साताऱयातील मारवाडी समाज एकत्र आला. या समाजामधील अनेकांना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो ही भावना स्वस्थ बसू देत नव्हती. समाजासाठी काहीतरी करावे या भावनेतून वीस जणांनी एकत्र येवून येथील माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना 2007 साली साताऱयात स्थापन केली पण नेमके करायचे काय हे काही कोणालाच सुचत नव्हते. एके दिवशी माधव सारडा पुणे येथील ससून रुग्णालयात नातेवाईकांची विचारपुस करण्यासाठी गेले. त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्याचे काम सुरु होते. माधव सारडा यांना हे काम भावले व त्यांनी आपल्या सहकाऱयांनी ही भावना बोलून दाखवली. सर्वांना हे काम पसंत पडलेव जानेवारी 2007 साली सिव्हील सर्जन यांची लेखी परवानगी घेवून या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली.

सुरुवातीला रुग्णांच्या नातेवाईकांपैकी 50 लोकांना दुपारचे भोजन सुरु करण्यात आले. त्यामध्ये तीन चपात्या, भाजी, भात, आमटी देण्यात येवू लागली. आता हा आकडा 80 जणांवर पोहोचला आहे. आता रोज 80 लोक या जेवणाचा आनंद घेतात. संस्थेचे हे काम करताना कुठे आर्थिक अडचण येवू नये यासाठी माधव सारडांसह त्यांचे अन्य सहकारी झटत होते, परंतु म्हणतात ना, ‘अकेला चला था मंझीलपर लोग आते गए और काँरवा बनता गया’ यापद्धतीने समाजातील अनेक दानशूर लोक या संस्थेच्या निमित्ताने पुढे आले. मग कोणी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ जेवण देवू लागले तर कोणी वाढदिवसाच्या निमित्ताने यासाठी संस्थेकडे तीन हजार रुपये द्यायचे असतात तर गोड जेवण देणार असाल तर साडेतीन हजार रुपये द्यावे लागतात मग त्या दिवसाचे जेवण ज्यांनी पैसे दिलेत त्यांच्या हस्ते वाटत करण्यात येते. माहळाच्या महिन्यात अनेकजण येथे जेवण्यासाठी मदत करतात.

पाहता-पाहता नऊ वर्ष कधी गेली हे माधव सारडांना समजले देखील नाही व आज एक दिवस खाडा न  करता आपण भोजनावळी वाढत गेलो यामध्ये भगवंतांचीच कृपा असल्याचे सारडा म्हणतात, सर्व धर्माच्या सणादिवशी भोजनामध्ये गोड पदार्थ आवर्जुन †िदला जातो, मग मुस्लीमांची ईद असेल तर शिरखुर्मा ठरलेला, दिवाळीला लाडू, चकली असतेच नाताळाला केक दिला जातो तर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जिलेबीसुद्धा असते. आजपर्यंत हा सर्व स्वयंपाक श्रीनाथ केटरर्सचे मंगलसिंह परमा करत आहेत. माधव सारडा हे सलग नउढ वर्ष स्वतः उपस्थित राहून जेवण वाढण्यासाठी मदत व देखरेख करतात.

हा प्रकल्प यशस्वी ठरत असतानाच गेल्या तीन वर्षापासून संस्थेची लोक रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत राजवाडा ते माहुली बसस्थानक फिरतात. जेथे कोणी उघडा किंवा आडोशाला झोपलेला दिसतो त्याला न उठवता त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकतात. तीन वर्षापूर्वी 50 लोकांच्या अंगावर ब्लँकेट टाकली. तर आता हा आकडा 28 पर्यंत आला आहे. म्हणजे किंचीतशी का होईना गरीबी दूर होत आहे, असे सारडा अभिमानाने सांगतात.

वृद्धाश्रमात वडिलांना टाकून मुले गेली ती परत आलीच नाहीत. शेवटी या वृद्धाला विनापैशाचे कसे सांभाळायचे असा प्रश्न या वृद्धाश्रमाला पडला हे ज्यावेळी माहेश्वरी ट्रस्टला समजले तेव्हा त्यांनी आजोबांनाच दत्तक घेतले. त्यांचा सर्व खर्च ही संस्था करीत आहे.