|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग 

अर्जुन युद्धापूर्वी जे निरीक्षण करू इच्छितो ते का महत्त्वाचे आहे? युद्ध कोणतेही असो, ते रणभूमीवर प्रत्यक्ष लढले जाण्यापूर्वी दोन्ही पक्षाच्या सेनानींच्या मनात लढले जात असते. त्यामुळे केवळ सरस युद्ध सामग्री आणि सैन्यबळ असले तरी युद्धात विजय प्राप्त होईलच असे सांगता येत नाही. अमेरिका आणि व्हिएतनाम यामधील युद्ध हे याचे ठळक उदाहरण आहे. प्रत्यक्ष युद्धात डोके शांत ठेवणे सर्वात जास्त आवश्यक आणि अवघडही असते असे म्हणतात ते खोटे नाही. हे पूर्वनियोजन चुकले तर काय होते याची असंख्य उदाहरणे पुराणात आणि इतिहासात पाहता येतात.

 एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात एक रंजक कथा सांगितली आहे. महाबलवान रावणाला आपल्या शक्तीचा मोठाच अभिमान होता. पण त्याच्याशी कुस्ती करायला त्याला कोणी प्रतिस्पर्धी पहिलवान मिळेना. एकदा नारदमुनी रावणाकडे आले. रावण त्यांना म्हणाला, बर झालं नारदा, मला बरेच दिवस कुणाशी कुस्ती करायला मिळाले नाही. चल आपण कुस्ती खेळू. नारदमुनी म्हणाले अरे, मी असा दुबळा! तुझ्याशी काय कुस्ती खेळणार? पण मी तुला योग्य प्रतिस्पर्धी पहिलवान सुचवतो. तू पाताळात बळीराजाकडे जा. त्याला कुस्तीचे आव्हान दे. तो तुझ्याशी कुस्ती खेळू शकेल. त्याप्रमाणे रावण बळीराजाकडे गेला. त्यावेळी बळीराजा आपल्या राणीबरोबर सारीपाट खेळत होता. रावण तिथे गेला आणि त्याने बळीराजाला कुस्तीचे आव्हान दिले. तेवढय़ात सारीपाटाची एक सोंगटी मंचकावरून खाली उडून पडली. बळीराजा हसून रावणाला म्हणाला, कुस्तीचे मग बघू. आता आधी ती सोंगटी तेवढी आणून दे पाहू. रावणाने खूप प्रयत्न केला. सर्व ताकद लावून पाहिली पण त्याला ती सारीपाटाची सोंगटी काही उचलता येईना. रावण समाजायचे ते समजून चुकला. मान खाली घालून कुस्ती करण्यापूर्वीच माघारी परतला.  दुसऱया महायुद्धात अमेरिकेच्या शस्त्रसज्जतेचा अंदाजही न आलेल्या जपानने पर्ल हार्बरवर हल्ला चढवला. चवताळलेल्या अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकले आणि त्याने जो प्रचंड विध्वंस झाला त्याची पूर्वकल्पना अमेरिकेनेही केली नव्हती. ज्याप्रमाणे बाहेरच्या जगात छोटी मोठी युद्धे नेहमी चालू असतात तशी आपल्या मनातही ती चालू असतात. तुकाराम महाराजांनी याचे छान वर्णन केले आहे. 

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ।

अंतर्बाहय़ जग आणि मन ।।

आपल्या मनातच आपले असंख्य शत्रू दबा धरून बसलेले नाहीत का? या शत्रूंशी लढाई करण्यापूर्वी त्यांना ओळखणे आणि त्यांचे शांतपणे निरीक्षण करणे हे आवश्यक आहे. आपल्याला राग येतो. आपण त्याचे निरीक्षण करतो का? उलट रागाच्या म्हणजे आपल्या शत्रूच्या आहारी आपण जातो आणि पराभूत होतो.