|Sunday, July 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नव्या वर्षाच्या शुभेच्छा

नव्या वर्षाच्या शुभेच्छा 

2016 सालच्या 31 डिसेंबरला जे वाचक (संयमाने किंवा नाइलाजास्तव) वेळेवर निजले आणि 2017 सालच्या 1 जानेवारीला सकाळी वेळेवर उठले, त्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. त्यांना नवे वर्ष सात्त्विक आणि आरोग्यसंपन्न जावो.

नोटाबंदीवर उपाय म्हणून सारे आर्थिक व्यवहार डिजीटल करणार आहेत करणाऱया संगणकसाक्षरांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. त्यांना नवे वर्ष व्हायरसमुक्त जावो. संगणक साक्षर नसलेल्यांना देखील नव्या वर्षाच्या शुभेच्छा. त्यांना नोटाबंदीमुळे मोठी अडचण न येवो. त्यांचे साधेसुधे व्यवहार सुरळीतपणे पार पडोत.

ज्यांना टीव्हीवरच्या रटाळ कौटुंबिक मालिका, हसू न येणारे विनोदी कार्यक्रम, साडी नेसून टीव्हीवर धिंगाणा घालणारे पुरुष आणि तायाबायांना-नणंदा-वहिन्यांना सोपे प्रश्न विचारून बक्षीसे देणाऱया भावजींचे कार्यक्रम आवडतात त्यांना घरातल्या इतरांचे शिव्याशाप त्यांना मुळीच न बाधोत अशा शुभेच्छा. सरकारला शुभेच्छा. विरोधकांना शुभेच्छा. दोघांच्या डोळस आणि आंधळय़ा पाठीराख्यांना शुभेच्छा. दोघांची तळी उचलून किंवा दोघांवर टीका करून टीआरपी वसूल करणाऱया टीव्हीवाल्यांना शुभेच्छा. टीव्हीवर लुटुपुटीची भांडणे लढणाऱया राजकीय पक्षप्रवक्त्यांना शुभेच्छा. त्यांचे वादविवाद गंभीरपणे बघणाऱया माझ्यासारख्या बावळट प्रेक्षकांना शुभेच्छा. फेसबुक आणि सोशल मिडियावर आपल्याला आवडणाऱया नेत्याच्या बाजूने झुंजणाऱया वीरांना शुभेच्छा. त्या मारामारीमुळे खऱया जगात फरक पडतो असे समजणाऱया माझ्यासारख्या वेडपटांना शुभेच्छा. टीव्हीवरच्या आणि सोशल मिडियावरच्या मारामाऱया गंमत म्हणून बघणाऱया आणि त्यातून मनोरंजन करून घेणाऱया धूर्तांना शुभेच्छा.

चौकात पोलीस किंवा सीसीटीव्ही नसताना देखील वाहतुकीचे नियम पाळणाऱया आणि कोणतेच कायदे न मोडणाऱया खऱया देशभक्तांना शुभेच्छा. जातायेता याला किंवा त्याला देशभक्तीची किंवा देशद्रोहाची किंवा पुरोगामी किंवा प्रतिगामी असल्याची सर्टिफिकेटे वाटणाऱया रिकामटेकडय़ांना शुभेच्छा.

सिनेमात पाकिस्तानी कलाकार नको म्हणणाऱया नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा. पाकिस्तानी कलाकार असलेल्या सिनेनिर्मात्यांशी अर्थपूर्ण चर्चा केल्यावर विरोध मागे घेणाऱया नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा. 

आणखीन कोणी राहिले असतील त्या सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा.