|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » हागणदारीमुक्तीसाठी भंगार साठवणाऱयांवर कारवाई

हागणदारीमुक्तीसाठी भंगार साठवणाऱयांवर कारवाई 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी शहराच्या वादग्रस्त ठरलेल्या 64 कोटी नळपाणी योजनेचा दुसरा टप्प्यातील निधी लवकरात-लवकर मिळावा, यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कठोर निर्णय घेण्याचा निर्धार केला आहे. राजिवडा परिसरात रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या भंगाराच्या जागेवर शौचालये उभारुन तेथील लोकांची गैरसोय दूर करण्यासंदर्भात स्थानिक नगरसेवकांशी नुकतीच चर्चा झाली आहे. भंगारवाल्यांनी त्याकडे कानाडोळा केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्षांनी दिला आहे.

रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 64 कोटींची नळपाणी योजना मंजूर झाली आहे. यावरुन शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादही उफाळला होता. परंतु निवडणुकीत भाजपला पाणी योजनेचा निधी मंजूर करण्याच्या श्रेयाचा फायदा उठवता आला नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगर परिषदेला पहिला हप्ता शासनाकडून प्राप्त झाला आहे. दुसरा टप्प्याच्या निधीसाठी शासनाने अट घातली आहे. हा निधी मिळाला नाही तर योजना राबवणे शक्य होणार नाही. रत्नागिरी शहर हागणदारीमुक्त करण्याची अट नमूद करण्यात आली आहे. शहराच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण योजना असल्याने त्यासाठी नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी शहर 31 जानेवारीपर्यंत हागणदारीमुक्त करण्याची ‘डेडलाईन’ निश्चित केली आहे. ती यशस्वी करण्यासाठी किनारी भागातील झोपडपट्टी परिसरात प्राधान्याने शौचालये उभारण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. राजिवडा परिसरात पुलाजवळ अनेक भंगारवाल्यांनी अनधिकृतरित्या भंगार साचवून ठेवले आहे. ती जागा मोकळी केली तर सार्वजनिक शौचालये सहजपणे उभी राहू शकतात. यापूर्वी नगर परिषदेने सूचना देऊनही स्थानिकांकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही त्यांना पाठीशी घालत होते. ती जागा तत्काळ मोकळी करा, त्यासाठी नगर परिषदेची यंत्रणा लावून साफसफाई करावी, असे सक्त आदेश स्वच्छता विभागाला देण्यात आले आहेत.

स्वत:हून लोकांनी ते भंगार उचलले नाही तर पालिकेचा जेसीबी लावा, असेही सूचित करण्यात आले आहे. त्या लोकांची समजूत घालण्याची जबाबदारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुहेल मुकादम यांच्यावर सोपवली आहे. ज्या-ज्या लोकांनी भंगार ठेवले आहे, त्यांना सुरूवातीला नोटीस देण्याचे निर्देश स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांना दिले आहेत. 1 जानेवारीला रविवारची शासकीय सुट्टी असल्याने सोमवारी 2 जानेवारी 2017 ला याची कार्यवाही केली जाणार आहे. नगराध्यक्ष पंडित यांच्या कठोर भूमिकेची चर्चा सर्वत्र सुरु आहे. रत्नागिरी शहर हागणदारीमुक्तीत किनारी भागातील झोपडय़ांचा अडथळा आहे. जागेअभावी शौचालये उभारणे शक्य नाही. ते आव्हान पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष पंडित यांनी खुर्चीवर बसल्यानंतर लगेचच बैठकांना सुरूवात केली आहे. राजिवडा परिसरात बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.