|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » स्टेट बँकेपाठोपाठ अन्य बँकांकडून गृहकर्ज स्वस्त

स्टेट बँकेपाठोपाठ अन्य बँकांकडून गृहकर्ज स्वस्त 

वृत्तसंस्था/ मुंबई

स्टेट बँकेकडून नववर्षाचा मुहूर्त साधत व्याजदरात कपातीची घोषणा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेनेही व्याजदरकपात केली आहे. स्टेट बँकेने एमसीएलआर दोन वर्षासाठी 0.9 टक्क्यांनी कमी करत कर्जावरील सर्वसाधारण व्याजदर 9.10 टक्य्यावरून 8.6 टक्के इतके खाली आणले आहे. याचा मोठा लाभ गृहकर्जधारकांना होणार आहे.

या घोषणेनंतर 75 लाखापर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर आता 9.1 टक्के ऐवजी 8.6 टक्के आणि त्यापुढील रक्कमेच्या गृहकर्जाचे व्याजदर 9.15 टक्क्याऐवजी 8.65 एवढे राहणार आहेत. स्टेट बँकेपाठोपाठ युनीयन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनेही व्याजदरात कपातीचे निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक बँकेपाठोपाठ आयसीआयसीआय सारख्या खासगी क्षेत्रातील बँकाकडूनही लवकरच व्याजदरकपातीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

जुन्या योजनेचे पुनरूज्जीवन  

स्टेट बँकेकडून 5 वर्षापूर्वी मागे घेण्यात आलेली ‘टीसर कर्जदर’ योजना ही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गंत पहिल्या दोन वर्षासाठी व्याजदर 8.5 टक्के इतके स्थिर राहणार असून त्यानंतरच्या वर्षात प्रवाही व्याजदर आकारले जाणार आहे. नव्या वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडिया सहीत स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, आयडीबीआय, आणि इंडियन ओव्हरसीज बँकेकडूनही व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

7 टक्क्याहून कमी परतावा देणाऱया सरकारी बाँड्समधील गुंतवणुकीपेक्षा  गृहकर्जातील गुंतवणूक हे बँकेच्यादृष्टीने चांगले पर्याय असल्याचे स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.

गृहबांधणी, नूतनीकरणासहीत लघुउद्योगांच्यासाठीच्या कर्जावर करण्यात आलेली ही व्याजदरकपात नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलन टंचाईमुळे आलेल्या मंदीतून बाहेर पडण्यासाठी पूरक असल्याची आशा बँकेकडून व्यक्त केली जात आहे. 2018 च्या पहिल्या तिमाही सत्रापर्यंत  योजनेचे फलीत  सर्व अर्थव्यवस्थेवर  दिसण्यास सुरूवात होईल असे अनुमान आहे. आयडिएफसी बँकेचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव लाल यांनी मोदी सरकारच्या या घोषणेची प्रशंसा करत मागील सरकारांच्या तुलनेत सध्याचे सरकार लघुकर्ज वितरणांना अधिक  प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले.