|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » यादव-वाघेलाची शतकी भागीदारी

यादव-वाघेलाची शतकी भागीदारी 

वृत्तसंस्था/ राजकोट

सूर्यकुमार यादव व प्रफुल वाघेला यांनी नोंदवलेल्या शतकी भागीदारीमुळे मुंबईने रणजी उपांत्य लढतीच्या दुसऱया दिवशीअखेर 4 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली असून ते अद्याप 134 धावांनी मागे आहेत. त्याआधी तामिळनाडूचा पहिला डाव 305 धावांत संपुष्टात आला. विजय शंकरने अर्धशतक झळकवले तर शार्दुल ठाकुर, अभिषेक नायर यांनी प्रत्येकी चार बळी मिळविले.

तामिळनाडूने 6 बाद 261 या धावसंख्येवरून दुसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि त्यांच्या उर्वरित फलंदाजांनी केवळ 44 धावांची भर घातली. विजय शंकर व अश्विन क्रिस्ट यांनी सातव्या गडय़ासाठी 49 धावांची भागीदारी केली. विजय शंकर 50 धावा काढून बाद झाला. त्याने 88 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार मारले. क्रिस्ट, औशिक श्रीनिवास, विघ्नेश यांना झटपट बाद करून मुंबईने तामिळनाडूचा डाव 305 धावांवर संपुष्टात आणला. क्रिस्टने संयमी खेळ करीत 115 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. शार्दुल ठाकुर व अभिषेक नायर यांनी प्रत्येकी चार बळी मिळविले तर बलविंदर संधू व विजय गोहिल यांनी एकेक बळी मिळविला.

वाघेला-यादवची शतकी भागीदारी

मुंबईच्या डावाची सुरुवात मात्र खराबच झाली. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ 4 धावा काढून बाद झाला. क्रिस्टच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने त्याचा झेल टिपला. यानंतर प्रफुल वाघेला व सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी 121 धावांची भागीदारी केली. आक्रमक खेळणाऱया यादवला विजय शंकरने कार्तिककरवीच झेलबाद केले. त्याने 116 चेंडूत 11 चौकार, एका षटकाराच्या मदतीने 73 धावा जमविल्या. तीन धावांची भर पडल्यानंतर वाघेलाही धावचीत झाला. कर्णधार आदित्य तरेशी धाव घेताना गोंधळ झाल्याने वाघेलास तंबूत परतावे लागले. त्याने 134 चेंडूत 8 चौकारांसह 48 धावा केल्या. सिद्धेश लाडही (0) अपयशी ठरला. औशिक श्रीनिवासने त्याला तिसऱयाच चेंडूवर बाद केले. 43 व्या षटकातच तीनही बळी गेल्याने 1 बाद 125 अशा स्थितीवरून मुंबईची स्थिती 3 बाद 128 अशी झाली. पण तरे आणि श्रेयस अय्यर यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर मुंबईने 60 षटकांत 4 बाद 171 धावा जमविल्या असून ते अजून 134 धावांनी पिछाडीवर आहेत. तरे 19 व अय्यर 24 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : तामिळनाडू प.डाव 115.2 षटकांत सर्व बाद 305 (बाबा इंद्रजित 64, कौशिक गांधी व विजय शंकर प्रत्येकी 50, अभिनव मुकुंद 38, अश्विन क्रिस्ट 31, गंगा श्रीधर राजू 19, अवांतर 19, शार्दुल ठाकुर 4-75, अभिषेक नायर 4-66, संधू 1-56, गोहिल 1-62), मुंबई प.डाव 60 षटकांत 4 बाद 171 (प्रफुल वाघेला 48, सूर्यकुमार यादव 73, तरे खेळत आहे 19, श्रेयस अय्यर खेळत आहे 24, क्रिस्ट 1-48, औशिक श्रीनिवास 1-22, विजय शंकर 1-14).

Related posts: