|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका आज ठरणार

गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका आज ठरणार 

प्रतिनिधी/ पणजी

निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक आज मंगळवारी नवी दिल्लीला होत असून या बैठकीत गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. सर्वांचे लक्ष आजच्या या बैठकीकडे लागले असून निवडणुकांचा कार्यक्रम आज  किंवा ठरल्याप्रमाणे उद्या 4 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल, हे स्पष्ट होणार आहे.

नवी दिल्लीत निर्वाचन भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस संपूर्ण निवडणूक आयोग तसेच पाचही राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱयांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. गोव्यातून मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल दास हे येथून दिल्लीला रवाना झाले. आज सकाळपासून निवडणूक आयोगाची बैठक होईल, त्यात मुख्य निवडणूक आयोग सविस्तर चर्चा करतील. 5 ही राज्यातील निवडणूक अधिकारी निवडणुकीसाठी सारी यंत्रणा सज्ज ठेऊन आहेत. उत्तर प्रदेशाची निवडणूक 5 भागात होणार आहे. उत्तराखंडची निवडणूक एकाच दिवशी होईल, पंजाब व गोव्याची निवडणूक देखील एकाच दिवशी होईल.

आज निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करणार की उद्या करणार? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर लागलीच आचार संहिता लागू करण्यात येईल.

दरम्यान, गोव्यात 11 लाख 7 हजार मतदार असून अंतिम मतदार याद्या आणि मतदारांची संख्या 5 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.