|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वृत्तपत्रे भविष्यातही टिकतील!

वृत्तपत्रे भविष्यातही टिकतील! 

बांदासध्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा बोलबाला असला तरी वृत्तपत्राचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून लोकांना बातम्या मिळतात. मात्र, वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातम्यांबरोबर अग्रलेख, लेख वाचण्यास मिळतात. वृत्तपत्रे, बातम्या, अग्रलेख, लेख या माध्यमातून जनमत तयार करण्याचे काम होते. त्यामुळे आजच्या काळाबरोबर भविष्यातही वृत्तपत्रांचे महत्त्व कायम राहणार आहे, असे मत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले.

येथील संतोषी मंगल कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्राr जांभेकर यांच्या जयंती आणि पत्रकार दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघ आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने पत्रकारांना देण्यात येणाऱया पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर कुडाळचे वैद्य सुविनय दामले, जि. प. माजी सभापती प्रमोद कामत, जि. प. सदस्य गुरुनाथ पेडणेकर, सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, पं. स. सदस्या श्वेता कोरगावकर, बांद्याचे नूतन सरपंच बाळा आकेरकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सल्लागार संतोष वायंगणकर, सचिव गणेश जेठे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेमकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, प्रा. मिलिंद भोसले, ऍड. अनिल निरवडेकर उपस्थित होते.

जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारा वरिष्ठ पत्रकार पुरस्कार ‘तरुण भारत’चे कुडाळचे प्रतिनिधी प्रमोद ठाकुर यांना, सावंतवाडी तालुका संघाचा वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार बांद्याचे प्रतिनिधी रामदास जाधव यांना, हरिश्चंद्र ऊर्फ चंदू वाडीकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा समाजसेवक पुरस्कार सावंतवाडी प्रतिनिधी उमेश सावंत यांना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, शासनाच्या विविध योजना पत्रकार वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेपर्यंत नेतात. त्याशिवाय पत्रकार एखाद्या विषयावर लिखाण करून जनमत तयार करतो. पत्रकारांच्या लिखाणातून जनतेचे मत आमच्यापर्यंत पोहोचत असते. त्यातून निर्णय घेण्यास मदत मिळत असते.

    छापील बातम्यांचे मूल्य अधिक!

सध्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा बोलबाला आहे. या माध्यमातून लोकांना बातम्या मिळत असतात. या बातम्यांचे मूल्य अर्ध्या तासागणिक कमी होत जाते. त्या तुलनेत वृत्तपत्रांच्या बातम्यांचे मूल्य एक दिवस असते. वृत्रपत्रे जनमत बनवितात. त्यामुळे वृत्तपत्रांचे महत्त्व यापुढेही कायम राहील.

प्रमोद कामत यांनी पत्रकारांच्या लेखनामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळत असते. तसेच समाजातील विविध समस्या निराकरण करणे शक्य होते, असे सांगितले. यावेळी अन्नपूर्णा कोरगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा शोध पत्रकारिता पुरस्कार वैभववाडीचे प्रकाश काळे, आदर्श पत्रकार पुरस्कार वेंगुर्ल्याचे दाजी नाईक, युवा पत्रकार पुरस्कार मालवणचे मंगेश नलावडे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार सचिन रेडकर, बाप्पा धारणकर अष्टपैलू पत्रकार पुरस्कार सागर चव्हाण यांना
प्रदान करण्यात आला.

प्रास्ताविक गणेश जेठे यांनी तर स्वागत गजानन नाईक, विजय देसाई यांनी तर सूत्रसंचालन देवयानी वरसकर यांनी केले. आभार आशुतोष भांगले यांनी मानले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सामंत, माजी तालुकाध्यक्ष राजेश मोंडकर, उपाध्यक्ष हर्षवर्धन धारणकर, अर्जुन राणे, रामचंद्र कुडाळकर, मयूर चराठकर, नीलेश मोरजकर, प्रभाकर धुरी, संजय मालवणकर, मनोज चव्हाण, संतोष सावंत, सचिन मांजरेकर, दीपक गावकर, रमेश जोगळे, अभिमन्यू लोंढे, तुकाराम परब आदी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त प्रमोद ठाकुर, रामदास जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारामुळे कामाची पोचपावती मिळाली. तसेच जबाबदारीही वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुविनय दामले यांनी ताणतणाव कसा कमी करावा, याबाबत मार्गदर्शन केले.