|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भूमिगत वाहिन्या पालिकेसाठी डोकेदुखी

भूमिगत वाहिन्या पालिकेसाठी डोकेदुखी 

खारघर / प्रतिनिधी

दिवाळी झाली की खारघरमध्ये विविध कंपन्या सिडकोच्या मुख्यालयातून परवानगी घेऊन भूमिगत वाहिन्यांसाठी खोदकाम करून कामे करून घेतात. मात्र, त्यानंतर रस्ते दुरुस्त न करताच पसार होतात. पनवेल पालिकेने हस्तांतरणापूर्वी याकडे दुर्लक्ष केल्यास पावसाळय़ात नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करताना अधिकाऱयांना नाकीनऊ येणार आहेत.

पनवेल पालिकेची स्थापना झाल्यापासून परिसरात कामाला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात खारघर नोड पालिकेकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोने सेक्टरनिहाय फायली तयार केल्या आहेत. सध्या खारघर परिसरात विविध कंपन्यांकडून भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले जाते. त्यानंतर रस्त्यावर डांबरीकरण न करता केवळ मातीचा भराव टाकण्यात आला आहे. सिडकोच्या मुख्य कार्यालयातून खोदकामाची परवागनी देताना स्थानिक अधिकाऱयांना विश्वासात घेतले जात नाही. वरिष्ठांकडून परवानगी दिल्या जात असल्यामुळे स्थानिक अधिकारी कंपनीच्याविरोधात ब्र काढत नाहीत. रस्ते खोदकाम करताना बहुतांश माती गटारात जाऊन पडते. पावसाळा सुरू झाल्यावर रस्त्यावर खड्डे पडणे, पाण्याचा निचरा न होणे अशा अनेक समस्या डोके वर काढतात. सिडकोकडे तक्रार करूनही आश्वासनांपलीकडे काहीही केले जात नाही. मात्र, काही दिवसातच खारघर विभागाचे सिडकोकडे हस्तांतरण केले जाणार आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱयांना पावसाळय़ात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

पालिकेच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे खारघरमधील काही रस्ते खराब झाले आहेत. पालिका रस्त्याचे परिपूर्ण काम झाल्याशिवाय ताब्यात घेणार नाही.

डॉ. सुधाकर शिंदे

पालिका आयुक्त

खारघरमध्ये खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे केले जातील. याविषयी स्थानिक अधिकाऱयांना माहिती दिली आहे.

के. के. वरखेडकर

मुख्य अभियंता सिडको