|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काँग्रेसची उमेदवारी यादी 10 रोजी

काँग्रेसची उमेदवारी यादी 10 रोजी 

प्रतिनिधी/ पणजी

येत्या 10 जानेवारी रोजी दिल्लीत काँग्रेस केंद्रीय समितीची बैठक होणार असून त्यात गोव्यातील बहुतांश उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी दिली. तत्पूर्वी 9 जानेवारी रोजी गोवा प्रदेश काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक होणार असून त्यात उमेदवारांची नावे निश्चित करून ती यादी केंद्रीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काल शुक्रवारी पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले की काँग्रेसची समविचारी पक्षांशी युती व्हावी असे काही आमदारांचे मत असून त्यात गैर काही नाही. काँग्रेस पक्षात एकटा माणूस नेता निर्णय घेत नाही, तर तो लोकशाही पद्धतीने सामुहिक असतो. युतीचा प्रस्ताव आहे परंतु त्यापेक्षाही जनतेचा विश्वास कसा संपादन करता येईल, यावर काँग्रेसचा भर आहे. सर्व 40 मतदारसंघांत उमेदवार उभे करून निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

पर्रीकरांकडून गोवेकरांची फसवणूक

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोमंतकीय जनतेची फसवणूक केल्याचे सांगून चोडणकर म्हणाले की त्यांनी बेकार भत्ता देण्याचे आश्वासन बेकारांना दिले होते. परंतु आता 5 वर्षे कार्यकाल संपत आला तरी देखील त्याचा पत्ता नाही. पन्नास हजार नोकऱयांचे आश्वासन दिले होते, तेही पाळलेले नाही. कचरा मुक्त गोवा व भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचे आश्वासनही देण्यात आले होते. त्याचाही पत्ता नाही. कचऱयाचा प्रश्न तसाच असून भ्रष्टाचार तर वाढला आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली असून चोऱयांचे प्रमाण भलतेच वाढले आहे. संबंधितांनी त्याकडे लक्ष द्यावे. गोवा सुरक्षा मंचाकडे युती होणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.