|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » यशवंत महोत्सवाने कराडकरांशी दृढ ऋणानुबंध

यशवंत महोत्सवाने कराडकरांशी दृढ ऋणानुबंध 

प्रतिनिधी/ कराड
यशवंत महोत्सवाच्या सातव्या पर्वातील दुसऱया दिवशी हभप भगवती महाराज यांचे कीर्तन पार पडले. त्यांनी प्रथम कराडकर भाविकांचे आभार मानले. डिसेंबर महिना आला की आपण सर्वजण या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहता. महोत्सवामुळे आपले ऋणानुबंध अधिक रुढ झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
हभप भगवती महाराज यांनी ‘धन्य आज दिन दर्शन संतांचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्य रुप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार’ हा अभंगच पुढे चालू ठेवला. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार स्वतः ज्ञानदेव महाराज असून पुढील कार्यसिध्दीसाठी ज्ञानदेवांचा अवतार म्हणजेच माऊली महावैष्णव श्री.नाथबाबा तथा एकनाथ महाराज होय. ज्ञानदेवांनी शुध्दीपत्रासाठी रेडय़ामुखी वेद बोलविला आणि ते शुध्दीपत्र मिळाल्यानंतर त्यास ज्ञानदेवांनी स्पष्ट नकार दिला. वयाच्या 21 व्या वर्षी समाधी घेतली. ज्ञानदेवांनी जीवनामध्ये लिहलेले आहे, ते भोगलेले आहे आणि ते नाथबाबांच्या रुपाने भोगलेले आहे. नाथबाबांइतका सांप्रदाय कोणीही लिहलेला नाही.
जीवनामध्ये नेहमी चढउतार येतात पण ते भोगताना परमार्थ कधी हेलकावे खातो, समजतच नाही. म्हणजेच आपली पत्नी, मुले यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जो लगाव आहे, यातच खरी जीवनाची मजा आहे. भगवान गौतम बुध्द, भगवान महावीर यांचा जन्म राजघराण्यामध्ये झाला. परंतु त्यांनी त्यांच्या राजवैभवाचा सर्वस्वी त्याग केला. मनुष्याचा ईश्वरी सत्तेकडे जाण्याचा उद्देश असावा. या उद्देशावरचे लक्ष ढळू देऊ नये आणि जर लक्ष ढळलं तर सावध करावे. ईश्वरी सत्तेकडे जायचे असेल तर संतांचा आधार घेऊन जावे लागते.
महोत्सवात यशवंत बँकेच्या व यशवंत महिला प्रतिष्ठानच्या वतीने ’महाराष्ट्र खाद्य संस्कृती महोत्सव‘ चा दिमाखात प्रारंभ झाला. या महोत्सवास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.