|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पर्यटकांसाठी तात्पुरत्या निवासासाठी नवी योजना

पर्यटकांसाठी तात्पुरत्या निवासासाठी नवी योजना 

सिंधुदुर्गनगरीगोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील समुद्र किनाऱयावरील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी जिल्हय़ातील समुद्र किनारे आणि खाडी किनाऱयावर तात्पुरती निवासस्थाने, टेंटस् उभारण्याची नवी योजना जिल्हा नियोजनमधून मंजूर करण्यात आली आली आहे. या योजनेंतर्गत दोन लाखापासून पंचवीस लाखापर्यंतचा निधी निवासस्थाने बांधणाऱयांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हय़ातील 26 समुद्र व खाडी किनाऱयांची पर्यटन स्थळेही निश्चित करण्यात आली आहेत. या नव्या योजनेमुळे जिल्हय़ातील पर्यटन स्थळांच्या विकासाबरोबरच समुद्र व खाडी किनाऱयावरील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हय़ाला लागूनच असलेल्या गोवा राज्यामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. विशेषतः गोव्याच्या समुद्र किनाऱयावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. परंतु गोव्याप्रमाणेच किंबहुना गोव्यापेक्षाही अतिशय सुंदर व स्वच्छ समुद्र किनारे असूनदेखील पर्यटक तेवढय़ा प्रमाणात जिल्हय़ात येत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे किनारपट्टी भागात सीआरझेडच्या कायद्यामुळे पक्के बांधकाम करून पर्यटकांसाठी निवासस्थाने व सोईसुविधा उपलब्ध करून देता येत नाही. परंतु, गोव्यातील समुद्रकिनाऱयावर तात्पुरत्या स्वरुपात निवासस्थाने, कॉटेज, टेंट्स उभारले जातात आणि पर्यटकांना सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याच धर्तावर आता सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या समुद्र, खाडी किनाऱयावर पर्यटकांच्या सोईसाठी तात्पुरती निवासस्थाने, टेंटस् उभारले जाणार आहेत. त्यासाठी किनारपट्टी व खाडी किनारी ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे आणि ते निवासस्थाने उभारण्यास इच्छूक आहेत, अशा लोकांना दोन लाखापासून 25 लाखापर्यंतचा निधी शून्य टक्के व्याज दराने दरवर्षी 10 टक्के परताव्याच्या अटीवर दिला जाणार आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हा नियोजन समितीमधून समुद्रकिनारे व खाडी किनाऱयांवरील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची नवी योजना आणली आहे. या योजनेसाठी जिल्हय़ाधिकाऱयांनी दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हय़ातील 26 समुद्रकिनारे व खाडी किनाऱयांवरील पर्यटन स्थळेही निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यामध्ये रेडी यशवंतगड, सुकळभाट समुद्रकिनारा, शिरोडा वेळागर, सागरतीर्थ वेळागर, मोचेमाड, सागरेश्वर, नवाबाग मूठ, निवती मेढा, म्हापण, खवणे, भोगवे, किल्लेनिवती, कोरजाई, मालवण तालुक्यातील तोंडवळी, वायंगणी, आचरा, हडी खाडी किनारा, देवगड तालुक्यातील मिठबाव, तांबळडेग, कुणकेश्वर, मिठमुंबरी, पडवणे, गिर्ये, विजयदुर्ग, सावंतवाडी तालुक्यातील आरेंदा खाडी किनारा, कवठणी खाडी किनारा, सातार्डा खाडी किनारा आणि डिंगणे मामाचा गाव अशा एकूण 26 पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय पर्यटन विकास समितीने स्थानिक इच्छूक नागरिक आणि शासन यांची भागीदारी ठरवीत दोन्ही बाजूच्या क्षमतेचा, अनुभवाचा आणि कौशल्याचा विचार करून इच्छूक नागरिकांना निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. वरील पैकी कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी लाभार्थ्यांची स्वतःची किमान 20 गुंठे जमीन असल्यास निवासस्थाने, टेंट्स उभारण्यासाठी कमीत कमी दोन लाख व जास्तीत जास्त 25 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हा निधी शून्य टक्के व्याजदराने गुंतवणुकीच्या स्वरुपात रक्कम दिल्यानंतर दरवर्षी दहा टक्के परताव्याची रक्कम भरणा करावी लागणार आहे. तोपर्यंत निवासस्थानांची मालकी शासनाची राहील. मात्र पूर्णपणे रक्कम भरल्यानंतर निवासस्थनांची मालकी लाभार्थ्याकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

Related posts: