|Sunday, July 30, 2017
You are here: Home » क्रिडा » मुंबईविरुद्ध गुजरातला महत्त्वपूर्ण आघाडीमुंबईविरुद्ध गुजरातला महत्त्वपूर्ण आघाडी 

पार्थिव पटेल-मनप्रीत जुनेजा यांची चौथ्या गडय़ासाठी 120 धावांची भागीदारी

वृत्तसंस्था/ इंदोर

कर्णधार पार्थिव पटेलने शतक हुकले तरी मनप्रीत जुनेजासमवेत चौथ्या गडय़ासाठी 120 धावांची दमदार भागीदारी साकारल्यानंतर रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत गुजरातने विद्यमान विजेत्या मुंबईविरुद्ध दुसऱया दिवसअखेर 63 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मुंबईच्या पहिल्या डावातील सर्वबाद 228 धावांवर उत्तर देताना गुजरातने दुसऱया दिवसअखेर 6 बाद 291 धावांपर्यंत मजल मारली असून पार्थिवने 146 चेंडूत 90 धावांची खेळी साकारली तर जुनेजाने 95 चेंडूत 77 धावांचे योगदान दिले. दिवसअखेर चिराग गांधी 17 तर रुश कलारिया 16 धावांवर नाबाद राहिले.

66 वर्षात प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या गुजरातने बुधवारी दिवसाच्या प्रारंभी बिनबाद 2 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. मात्र, समित गोहेल (4) व प्रियंक पांचाळ (6) अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर गुजरातची एकवेळ 2 बाद 37 अशी बिकट स्थिती झाली. डावातील पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉकडून जीवदान मिळाल्यानंतरही समितला याचा लाभ घेता आला नाही. मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर पहिल्या स्लीपमध्ये यादवने त्याचा सोपा झेल टिपला. समितला 34 चेंडूत 4 धावा जमवता आल्या.

त्यानंतर या हंगामात तब्बल 1270 धावांची आतषबाजी करणाऱया प्रियंक पांचाळला देखील येथे धावांच्या दुष्काळाचा सामना करत अपयश झेलावे लागले. 51 चेंडूंचा सामना केल्यानंतरही त्याला सूर सापडला नाही. अभिषेक नायरच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देत त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. हा दुहेरी झटका गुजरातच्या गोटात अर्थातच खळबळ उडवणारा होता. पण, पार्थिव पटेलने अनुभव पणाला लावत प्रत्येक चेंडू त्याच्या ‘मेरिट’प्रमाणे खेळत संघाला सुस्थितीत आणले. शिवाय, त्याला जुनेजाची देखील उत्तम, समयोचित साथ लाभली.

पार्थिव-जुनेजाची आक्रमक फलंदाजी

पार्थिवने 146 चेंडूत 12 चौकारांसह 90 धावा केल्या. शिवाय, डावातील पडझड रोखत काही उत्तम भागीदारी देखील साकारण्यात मोलाचा वाटा उचलला. प्रारंभी त्याने भार्गव मेराईसमवेत 69 धावा जोडल्या तर नंतर जुनेजासमवेत 120 धावांची भागीदारी साकारली. जुनेजाने शार्दुल ठाकुरकडे परतीचा झेल देण्यापूर्वी 95 चेंडूत 77 धावांचे योगदान दिले. त्यात 11 चौकारांचा समावेश राहिला.

मेराई बाद झाल्यानंतर पार्थिवच्या साथीला जुनेजा मैदानात आला आणि त्यानंतर ही जोडी मुंबईच्या गोलंदाजांवर आणखी बरसत राहिली. या जोडीने षटकामागे 4.58 धावांच्या सरासरीने धावा वसूल करत मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. मुंबईच्या खराब क्षेत्ररक्षणाचा देखील मुंबईला पुरेपूर लाभ झाला. जुनेजाला नायरच्या गोलंदाजीवर शॉर्ट मिडविकेटवरील श्रेयस अय्यरने जीवदान दिले, याचाही त्यांना मोठा फटका बसला. जुनेजा त्यावेळी केवळ 15 धावांवर खेळत होता.

आघाडी भक्कम करण्याचा प्रयत्न

जुनेजाने या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेत पुढे जोरदार फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. ‘अंडरडॉग्ज’ मानला जाणारा गुजरातचा संघ या निर्णायक सामन्यात दुसऱया दिवसअखेर आता 63 धावांनी आघाडीवर असून ही आघाडी आणखी भक्कम करण्याचा त्यांचा इरादा असणार आहे. त्याचवेळी, मुंबईसमोर मात्र प्रतिस्पर्ध्यांची उर्वरित फलंदाजांची लाईनअप शक्य तितक्या लवकर गुंडाळण्याचे आव्हान असेल.

संक्षिप्त धावफलक

मुंबई पहिला डाव : सर्वबाद 228.

गुजरात पहिला डाव : 92 षटकात 6/291 (पार्थिव पटेल 146 चेंडूत 12 चौकारांसह 90, मनप्रीत जुनेजा 95 चेंडूत 11 चौकारांसह 77, भार्गव मेराई 100 चेंडूत 7 चौकारांसह 45, रुजूल भट्ट 4 चौकारांसह 25. अवांतर 11. अभिषेक नायर 3/91, शार्दुल ठाकुर 2/67, संधू 1/54).

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!