|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन

माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन 

पुण्यात बोपोडी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार : राजकीय क्षेत्रात शोककळा

 प्रतिनिधी/ पुणे

माजी पर्यटन राज्यमंत्री आणि पुण्याचे माजी महापौर चंद्रकांत छाजेड यांचे शुक्रवारी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुली असा परिवार होता.

छाजेड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालविली. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बोपोडी येथील स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

छाजेड यांचा जन्म 1950 चा. काँग्रेसमध्येच त्यांची राजकीय जडणघडण झाली.  पक्षात त्यांनी विविध जबाबदाऱया पार पाडल्या. काँग्रेसमधील ते निष्ठावान सैनिक होते. 1978 ते 2002 या कालावधीत त्यांनी नगरसेवकपद भूषविले. तब्बल पाच वेळा ते महापालिकेमध्ये निवडून आले. बोपोडीचा विकास करण्यामध्ये छाजेड यांचा मोठा हातभार आहे. नगरसेवकाच्या काळात 1987 ते 88 या एक वर्षाच्या कालाधीत पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले.  त्यानंतर त्यांनी 1992 ते 2002 पर्यंत महापालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून त्यांनी भूमिका बजावली. या पदावर त्यांनी आपला ठसा उमटविला. तर 1999 ते 2009 या कालावधीत ते आमदार होते. 1999 मध्ये सलग पाच वेळा आमदार असलेल्या शिक्षणसम्राट रामभाऊ मोझे यांचा त्यांनी मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते पर्यटन राज्यमंत्री होते.

‘मामू’ नावाने परिचित

चंद्रकांत छाजेड राजकीय क्षेत्रात मामू या नावाने परिचित होते. त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. महापालिकेमध्ये सर्वांना सोबत घेऊन सभागृहामध्ये विषय मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. शहराच्या राजकारणातील रणनीतीज्ञ अशी त्यांची ख्याती होती. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने नेमलेल्या कार्ड कमिटीमध्ये ऍड. छाजेड यांचा समावेश होता.

नागरी संरक्षण कार्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित

छाजेड हे 1971 पासून नागरी संरक्षण दलात कार्यरत होते. चीन युद्धात त्यांनी नागरी संरक्षण दलात काम केले होते. विभागीय क्षेत्ररक्षक, उपमुख्य क्षेत्ररक्षक, प्रभारी मुख्य क्षेत्ररक्षक आदी पदांवर त्यांनी काम केले. या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर हे पारितोषिक मिळविणारे ते पहिलेच आमदार होते. पुणे नागरी संरक्षण दलाच्या मुख्य क्षेत्ररक्षकपदी त्यांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या राज्य शाखेतर्फे आमदार चंद्रकांत छाजेड यांचा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. जालन्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

छाजेड यांनी राजकारणातून समाजकारणाचा आदर्श प्रस्थापित केला : बापट

लोकसंग्रह आणि दांडगा जनसंपर्क यामुळे चंद्रकांत छाजेड पुण्याचे लोकप्रिय नेते होते. समाजकारणातून ते राजकारणाकडे वळल्यामुळे सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली होती. यामुळेच नगरसेवक, महापौर ते मंत्री असा त्यांचा यशस्वी प्रवास राहिला. राजकीय क्षेत्रात ‘मामू’ या नावाने ते प्रसिद्ध होते. महापालिका सभागृह नेते म्हणूनही त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्यांनी राजकारणातून समाजकारणाचा आदर्श प्रस्थापित केला, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात करणाऱया छाजेड यांचा जनसंपर्क व्यापक होता. विविध क्षेत्रातील त्यांचे कार्यही महत्वाचे आहे. पुणे मनपाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱया छाजेड यांनी पर्यटन राज्यमंत्री म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली. उत्कृष्ट संसदपटू असणाऱया छाजेड यांच्या पुढाकारामुळे झोपडपट्टीवासियांना नागरी सुविधा व पक्की घरे मिळण्यात मदत झाली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Related posts: