|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोण तिढा सोडविताना भाजपाला बंडाचा दणका

काणकोण तिढा सोडविताना भाजपाला बंडाचा दणका 

प्रतिनिधी/ काणकोण

काणकोण मतदारसंघातील भाजपाची उमेदवारी अखेर माजी आमदार विजय पै खोत यांनाच जाहीर झाली असून अपेक्षेप्रमाणे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांचा पत्ता कापण्यात त्यांच्या विरोधकांना यश आले आहे. या प्रकारामुळे तवडकर यांच्या समर्थकांत नाराजीचे, तर पै खोत समर्थक गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराने काणकोण भाजपात बंडाळीला आमंत्रण दिले असून या निर्णयाच्या निषेधार्थ स्थानिक भाजप मंडळ, युवा मोर्चा, महिला मोर्चा, बूथ समित्या यांच्या कित्येक पदाधिकारी व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. आदिवासी समाजावर भाजपाने केलेला अन्याय असे स्वरूप याला तवडकर गटाने दिले आहे. याचा फटका भाजपाला अन्य काही मतदारसंघांतही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पै खोत यांना भाजपाची अधिकृतरीत्या उमेदवारी मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली, तर तवडकर यांच्याही समर्थकांनी तेवढय़ाच संख्येने त्यांच्या रूबी रेसिडेन्सीमधील निवासस्थानी गर्दी करून पुढील चालीवर चर्चा केली. भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्या पाचात असूनही काणकोणची उमेदवारी जाहीर करायला विलंब झाला त्याचवेळी उमेदवारी मिळणार नाही की काय अशा संशय स्वतः तवडकर आणि त्यांच्या समर्थकांना भेडसावायला लागला होता.

परंतु काणकोण मतदारसंघात भाजपाला संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आणि आपल्या खात्यांना योग्य न्याय दिलेल्या तवडकर यांना पक्ष अशा तऱहेने बाजूला काढणार नाही, असा त्यांच्या सर्व समर्थकांना विश्वास होता. तरी देखील वारंवार समर्थकांच्या बैठका, समांतर प्रचार फेरी, आदिवासी समाजबांधवांच्या बैठका घेऊन पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न तवडकर यांनी सुरू केला. परंतु पै खोत यांचा दबाव आणि त्यांचा समर्थक गट खूपच समर्थ आणि प्रबळ असल्यामुळे काणकोणसारख्या भागात अनुसूचित जमाती बहुसंख्येने असूनही तवडकर यांना भाजापाने बाजूला काढले, अशी संतप्त प्रतिक्रिया काही समाजबांधवांनी उघडपणे व्यक्त करायला सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे, तर भाजप खरोखरच लब्धप्रतिष्ठितांचा पक्ष आहे की काय असा संशय आता यायला लागल्याची प्रतिक्रिया आदिवासी समाजातील काही शिक्षित युवक व्यक्त करायला लागले आहेत.

भाजपमध्ये बंड

या मतदारसंघातील भाजपाची उमेदवारी विजय पै खोत यांना जाहीर झाल्यानंतर बंड करण्याची धमकी रमेश तवडकर आणि त्यांच्या समर्थकांनी दिली होती. त्यानुसार भाजप मंडळ व अन्य समित्यांवरील अनेक पदाधिकारी व सदस्यांनी राजीनाम्याचा मार्ग पत्करला आहे. मात्र मंडळ समितीमधील काही सदस्य याबाबतीत समर्थन द्यायला तयार नसल्याचीही माहिती मिळाली आहे.

2012 च्या निवडणुकीत विजय पै खोत हे ज्येष्ठ सदस्य असताना त्यावेळच्या पैंगीण मतदारसंघातील रमेश तवडकर यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. त्यावेळी पै खोत स्वस्थ बसले होते. इतकेच नव्हे, तर ते तवडकर यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावरही चढले होते. हा इतिहास ताजा असताना तवडकर यांनीही थोडी माघार घ्यायला हवी. त्यात पक्षाचे आणि स्वतः तवडकर यांचेही हित आहे असे मानणारे भाजपाचे काही क्रियाशील कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत. पण नसती उठाठेव नको म्हणून हे कार्यकर्ते मूग गिळून गप्प आहेत.

पै खोत यांचे संयमी धोरण

या सर्व घडामोडींत विजय पै खोत अगदी संयमीपणे वागत आहेत. भाजपाची उमेदवारी त्यांना मिळाल्यानंतर मतदारसंघातील त्यांचे समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांनीही आनंद व्यक्त केला. आनंदोत्सव साजरा करताना पै खोत यांच्या समर्थकांनी फेरीही काढली. सध्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जी धूसफूस चालली आहे ती  संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर सहज दूर करतील, असा विश्वास या समर्थकांना आहे.

तवडकर समर्थकांशी काँग्रेसचा संपर्क

त्याचवेळी तवडकर यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांशी थेट संपर्क साधण्याच्या कामाला काँग्रेसचे नेते लागले असून आपली दारे सर्वांना खुली असल्याचा संदेश सोशल मीडियावरून या क्रियाशील कार्यकर्त्यांना पाठविण्याचे काम सध्या चालू आहे. काणकोणचा भाजपाचा गड राखून ठेवण्याची फार मोठी जबाबदारी पै खोत आणि त्यांच्या समर्थकांवर येऊन पडली आहे. मतदारसंघात काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांच्या साथीला सध्या भाजपात जी बंडाळी चालू आहे त्याचा लाभ उठविण्याच्या दृष्टीनेकाँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष ठेऊन आहेत.

काँग्रेस गोटात दिलजमाई

दरम्यान, मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केलेल्या दया पागी, जनार्दन भंडारी आणि महादेव देसाई यांच्यात दिलजमाई झाली असून त्यांनी एकसंधपणे काँग्रेसचे उमेदवार इजिदोर फर्नांडिस यांच्या विजयासाठी काम करण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती मिळाली आहे. केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी ही दिलजमाई घडवून आणली आहे. वरील चारही जणांनी त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाल्यास एकत्रितपणे काम केले जाईल, असे जाहीर केले होते. मात्र उमेदवारी जाहीर होण्याअगोदर इजिदोर फर्नांडिस आणि अन्य तिन्ही इच्छुक उमेदवार स्वतंत्रपणे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात गुंतले होते.

Related posts: