|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सुधाकरचा मृतदेह दरीतून बाहेर

सुधाकरचा मृतदेह दरीतून बाहेर 

आंबोली : आंबोली गेळे येथील कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत उडी टाकून आत्महत्या करणाऱया शिरसिंगे-मळईवाडी येथील सुधाकर देऊ राऊळ याचा मृतदेह रविवारी अथक प्रयत्नानंतर सांगेली येथील बाबल आल्मेडा यांच्या टीमने बाहेर काढला. सुमारे एक हजार फूट खोल दरीत असलेला मृतदेह या टीमने जीव धोक्यात घालून काढला. दरीत उडी टाकल्याने राऊळ यांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. दरम्यान, विच्छेदनासाठी मृतदेह सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला.

सुधाकर राऊळ यांनी पत्नीला फोन करून शुक्रवारी रात्री कावळेसाद पॉईंट येथील दरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. राऊळ यांचा मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी बाबल आल्मेडा टीमला शनिवारी पाचारण केले होते. या टीमचे किरण नार्वेकर मृतदेहापर्यंत पोहोचले होते. मात्र, रात्र झाल्याने मृतदेह काढण्याची मोहीम थांबविण्यात आली. या टीमने रविवारी दुपारी साडेतीन वाजता मोहीम पुन्हा हाती घेतली. अवघ्या एक तासात हजार फूट खोल दरीत असलेला मृतदेह बाहेर काढला. टीममध्ये बाबल आल्मेडा यांच्यासह अभय किनळोस्कर, पंढरी राऊळ, किरण नार्वेकर, सचिन नार्वेकर, शैलेश राऊळ, गुरुनाथ सावंत, रोहित राणे, संतान आल्मेडा, संतोष सावंत, लॉरेन्स आल्मेडा, फिलिप्स आल्मेडा तसेच सांगेलीतील ग्रामस्थ, हवालदार गजानन देसाई सहभागी झाले होते. शिरशिंगे
आणि आंबोलीतील ग्रामस्थांनी मृतदेह काढण्यासाठी सहकार्य केले. शिरशिंगेतील
ग्रामस्थ दरीच्या खालच्या भागातून आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस, निरीक्षक शंकर पाटील, सहाय्यक निरीक्षक अरुण जाधव, हवालदार गजेंद्र भिसे, प्रकाश कदम उपस्थित होते.

सुधाकर यांनी घरगुती भांडणातून आत्महत्या केल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले. मात्र, आत्महत्येसाठी त्यांनी कावळेसाद पॉईंटची का निवड केली, हा
प्रश्न अनुत्तरितच आहे.