|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डॉक्टरकडून रूग्णाला बेदम मारहाण

डॉक्टरकडून रूग्णाला बेदम मारहाण 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात एका रूग्णांनी दारूच्या नशेत डॉक्टराला शिवीगाळ  केल्याच्या प्रकारातून संबंधित डॉक्टरांनी पवार रूग्णाला बेदम मारल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. या संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांनी शहर पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आज निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.डी.आरसुळकर यांनी जि. प. कास्ट्राईब संघटनेला दिली.

  प्रशांत तुकाराम पवार यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवार हे शासकीय रूग्णालयातीलच एक कर्मचारी आहेत. डॉ. सुरेंद्र सुर्यगंध हे रूग्ण तपासणीसाठी वॉर्डमध्ये आले असता पवार हे नशेत शिवीगाळ करत होते. ही शिवीगाळ नेमके कोणाला करत होते, या विषयी अद्यापही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पवार हा त्यांना शिवीगाळ करत होता. नेमकी वस्तूस्थिती काय आहे, याची शहानिशा केल्याशिवाय कोणताही निर्णय प्रशासन घेणार नाही. दोन्ही बाजूंची सखोल चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, असे डॉ.आरसुळकर, डॉ.देवकर यांनी सांगितले. पवार हा शासकीय कर्मचारी असून तो आजारपणामुळे रूग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱयावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हा कास्ट्राईब संघटनेने केली आहे.

 या संबंधी प्रशांत पवार यांच्या सासू सविता नागशेखर पवार यांनी आपल्या जावयाला बेदम मारहाण संबंधित डॉक्टरांनी केली. आपण मध्ये सोडायला गेलो असतो आपला हात डॉक्टरांनी मुरगळला, अशा प्रकारची तक्रार शहर पोलीस स्थानकात नोंदवली आहे. त्यामुळे या प्रकरणाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र अद्यापही नेमके काय घडले? याची माहिती पुढे आली नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय आपण कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सिव्हीलच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडे स्पष्ट केले असून दुसरीकडे संबंधित अधिकाऱयावर कारवाई न झाल्यास शासकीय रूग्णालयातील सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशारा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सिव्हीलमध्ये आरपीआय संघटनेसह कास्ट्राईब संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच संबंधित रूग्णांच्या सर्व नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक दालनात गर्दी केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस स्थानकाकडून करण्यात येत आहे.

बांधून ठेवून मारहाणीचा आरोप

संबंधित डॉ.सुरेंद सूर्यगंध यांनी प्रशांत तुकाराम पवार याला बांधून ठेवून मारहाण केल्याचा आरोप पवार यांच्या सासू सौ.सविता पवार यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेवून त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा कर्मचारीही कामबंद आंदोलन करतील, असे कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले.