|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा डेअरीच्या कारभारात पारदर्शकता आणणार

गोवा डेअरीच्या कारभारात पारदर्शकता आणणार 

प्रतिनिधी/ फोंडा

गोवा दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या नूतन संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा काल शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. येत्या 29 जाने. रोजी गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक होणार होती. मात्र एकूण 25 उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने व उर्वरित 15 पैकी तिघां उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे.

डेअरीचे माजी अध्यक्ष तथा नूतन संचालक माधव सहकारी यांनी डेअरीचा कारभार अधिक पारदर्शक बनविण्यासाठी नूतन संचालक मंडळ कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. सुमूल डेअरीच्या गोव्यातील प्रवेशानंतर आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी त्यावेळेचे संचालक मंडळ कमी पडल्याने सुमुलला पाय पसरविणे शक्य झाले. आपल्या तीन महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दित काही गोष्टी रुळावर आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सुमूलचे उत्पादन घटले आहे.  नवीन संचालक मंडळाला डेअरीच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणतानाच अन्य काही गोष्टीबाबत काटेकोर निर्णय घ्यावे लागतील. दूध उत्पादक, स्थानिक दूध संस्थांबरोबरच कामगार व ग्राहकांच्याही काही प्रश्नांकडे लक्ष घालावे लागेल. तसेच दुधाच्या उत्पादनात वाढ करण्याचे उद्दिष्ठ ठेवून दीड लाख लिटरपर्यंत  लक्ष गाठावे लागेल, असे माधव सहकारी यांनी सांगितले. मोठय़ा प्रमाणात उमेदवारी अर्ज बाद ठरण्यामागे सुधारीत निवडणूक प्रक्रिया महत्वाची ठरली असून या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

नूतन संचालक मंडळामध्ये विठोबा देसाई, विजयकुमार पाटील, उल्हास सिनारी, राजेश फळदेसाई, राजेंद्र सावळ, नरेश मळीक, गुरुदास परब, धनंजय देसाई, माधव सहकारी, बाबू कोमरपंत, अजय देसाई, बाबुराव फट्टो देसाई यांचा समावेश होता. 12 पैकी आठ संचालक जुने असून अजय देसाई, विजयकुमार पाटील, राजेश फळदेसाई व बाबू कोमरपंत हे नवीन आहेत. येत्या महिन्याभरात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Related posts: