|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्नेहलता चोरगेंचा काँग्रेसला रामराम

स्नेहलता चोरगेंचा काँग्रेसला रामराम 

वैभववाडी : काँग्रेस पदाधिकाऱयांकडून सतत पक्ष कार्यामध्ये अविश्वास दाखविला जात असल्याने व पक्षामध्ये सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जि. प. च्या माजी महिला बालविकास सभापती स्नेहलता चोरगे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सौ. चोरगे यांचे पती सदाशिव चोरगे यांनी यावेळी काँग्रेस पदाधिकाऱयांवर घणाघाती आरोप केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मागील वर्षी झालेल्या वाभवे-वैभववाडी नगर पंचायत निवडणुकीत मतदानादिवशी काँग्रेस पदाधिकाऱयांनी स्नेहलता चोरगे यांना नजरकैदेत ठेवले होते. मतदान होईपर्यंत संपर्क होऊ दिला नाही. एवढा अविश्वास दाखविण्यात आला. मात्र, नारायण राणे यांनी टाकलेली जबाबदारी, त्यांनी दाखविलेला विश्वास यामुळे आम्ही आतापर्यंत गप्प राहिलो. आपल्या पत्नीच्या खोटय़ा तक्रारी करून स्थानिक पदाधिकाऱयांनी नेहमीच वरिष्ठांचे त्यांच्याबद्दल वाईट मत होईल, असे प्रयत्न केले.

एका पदाधिकाऱयांने तर आपल्या पत्नीला हिन वागणूक देत “तुला मस्ती आली आहे काय?’’ असा प्रश्न केला होता. मात्र, संबंधिताला कोणीच जाब विचारला नाही. या सर्व घटनांचा आपल्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत स्नेहलता चोरगे यांच्या प्रचारासाठी ज्या प्रमुख पदाधिकाऱयांनी मेहनत घेतली, ती केवळ स्वतःला कामे मिळण्यासाठी घेतली असल्याचे ते म्हणाले.

चोरगे पुढे म्हणाले, आपण वैभववाडीत गेली 45 वर्षे सन्मानाने काढली. पत्नीला सामाजिक कार्याची आवड असल्याने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे संसारात अनेकवेळा ओढाताण सहन करावी लागली. स्वकर्तृत्वाने येथे नोकरी, शेती व्यवसाय उभा केला. कोणत्याही वाईट मार्गाने पैसा कमविला नाही. पक्षातील पदाधिकाऱयांचा त्रास केवळ राणेंच्या प्रेमापोटी सहन केला. मात्र, हे सर्व असहाय्य झाल्याने पत्नीला राजीनामा देण्यास सांगितले. यापुढे स्नेहलता चोरगे आपल्याबरोबर शेतीत लक्ष देऊन तेथे आपल्याला व्यवसायात सहकार्य करणार आहेत. पुढील जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो आपण घेणार आहोत. आपली पत्नी कोणताच निर्णय घेणार नाही, असेही श्री. चोरगे म्हणाले.

एकूणच जि. प., पं. स. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकारी स्नेहलता चोरगे यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसमध्ये असलेले अंतर्गत मतभेदही चव्हाटय़ावर आले आहेत.

Related posts: