|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा 

प्रतिनिधी / बेळगाव

येथील पंडित नेहरू जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी जयकुमार आणि केएलई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. व्ही. डी. पाटील यांचा जिल्हा प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला. तसेच बेळगाव परिसरातील स्वातंत्र्यसेनानींचाही गौरव करण्यात आला. देवगिरी येथील सदाशिवराव भोसले, गोकाकचे कर्लिंगनावर, शिवाजीनगरचे सोमलिंग मळगली, राजेंद्र कलघटगी व बाळगौडा पाटील या स्वातंत्र्ययोद्धय़ांनी पुरस्कार स्वीकारला. सर्वोत्तम नागरी पुरस्कार कृषी विभागात अत्युत्तम सेवा बजाविल्याबद्दल एच. डी. कोळेकर, संकेश्वर येथील मुरारजी वसतीशाळेचे प्राचार्य गोविंद, कविता वाघे, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविल्याबद्दल अभियंते बी. जी. रायकर व दीपक गोणी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

संपूर्ण क्रीडांगण केसरी, पांढऱया व हिरव्या रंगांचे कपडे परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी खुलले होते. राष्ट्रगीतानंतर भारत माता की जय या घोषणेने संपूर्ण स्टेडियम दुमदुमले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भव्य देशभक्तीपर गीतांवरील नृत्यांनी वातावरण रोमांचित केले.

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एनसीसी, स्काऊट व पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, पीक विमा योजनेंतर्गत बेळगाव जिल्हय़ातील 2 लाख 11 हजार शेतकऱयांनी नोंदणी केली आहे. यात बेळगावने कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक घेतला आहे. जिल्हय़ातील आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून 5 लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचे सांगितले. जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आठ पशुचिकित्सा केंदे व चार पशुवैद्यकीय केंद्रे सुरू केल्याचे सांगितले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एन. जयराम, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, महापौर सरिता पाटील, खासदार सुरेश अंगडी, आमदार फिरोज शेट, संजय पाटील, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, आयजीपी डॉ. के. रामचंद्रराव, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. बी. आर. रविकांतेगौडा, डीसीपी राधिका, पालिका आयुक्त शशीधर कुरेर, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related posts: