|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नागपूर पोलीस आयुक्तांना जनरल डायर पुरस्कार देणार

नागपूर पोलीस आयुक्तांना जनरल डायर पुरस्कार देणार 

मुंबई

 नथुराम गोडसेच्या नाटकासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना गोळीबाराची जाहीर धमकी देण्याच्या प्रकरणावरून नागपूरच्या पोलीस आयुक्तांना गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या कार्यालयात जनरल डायर पुरस्कार प्रदान करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱया नाटकाचा 22 जानेवारी 2017 रोजी नागपूर येथे प्रयोग असताना त्याचा निषेध करण्यासाठी काँगेस व इतर संघटनांचे कार्यकर्ते शांततापूर्वक निदर्शने करीत असताना त्यांना पोलिसांच्यावतीने गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक दाखविण्यात आला होता. या प्रकारामुळे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांसह पोलीस मॅन्युअलचे देखील उल्लंघन झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली होती. परंतु, सरकारने त्या मागणीला काहीही उत्तर दिले नसून नागपूरचे पोलीस आयुक्त देखील दोषी अधिकाऱयांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागपूर शहरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’ पुरस्कार देणार असल्याचे विखे-पाटील म्हणाले. हे राम नथुराम या शरद पोंक्षे यांच्या नाटकावरून सध्या महाराष्ट्रात वादळ उठले आहे. सेन्सॉर बोर्डाने संमत केलेल्या या नाटकाला महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. मात्र नाटकाच्या प्रयोगांना चांगल्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. या नाटकात सत्य घटना सांगितलेल्या नाहीत असा आरोप केला जात आहे.