|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » …अन्यथा शिवप्रेमींसह पालिकेसमोर उपोषण करू

…अन्यथा शिवप्रेमींसह पालिकेसमोर उपोषण करू 

प्रतिनिधी/ निपाणी

येथील राजा शिवछत्रपती भवनाचे बांधकाम निधी असूनही वर्षभरापासून स्थगित राहिले आहे. राजा शिवछत्रपती भवन हा आपल्यासह तमाम शिवप्रेमींच्या जिव्हाळ्य़ाचा विषय आहे. त्यामुळे स्थगित झालेले काम येत्या 19 फेबुवारीपूर्वी म्हणजेच शिवजयंतीपूर्वी सुरू करावे. अन्यथा सहकाऱयांसह शिवप्रेमींसमवेत पालिकेसमोर उपोषण करू, असा इशारा नगरसेवक प्रविण भाटले-सडोलकर यांनी दिला आहे.

मुरगूड रोडवरील हॉटेल प्रविण डिलक्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाटले पुढे म्हणाले, निपाणीसह परिसराच्या सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेले राजा शिवछत्रपती भवनाचा 2009 मध्ये आराखडा तयार झाला. त्यानंतर तीन वर्षांनी बांधकामास सुरुवात करण्यात आली. सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चाच्या सदर भवनासाठी आतापर्यंत 1 कोटी 10 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले आहे. मात्र पाच वर्षापूर्वी सुरु झालेले बांधकाम आतापर्यंत केवळ 50 टक्केच झाले आहे. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून सांस्कृतिक भवनाचे काम बंद आहे. त्यामुळे बांधकामाचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे.

 येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना राजा शिवछत्रपती भवनासाठी मुख्यमंत्री निधीतून 1 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानंतर 2009-10 मध्ये एसएफसी मुक्त निधीतून 30 लाख व 2010-11 मध्ये पालिकेतर्फे 78 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर भवनासमोर भव्य अशा अश्वारुढ शिवपुतळ्य़ाच्या पाया खोदाईप्रसंगी आमदार शशिकला जोल्ले यांनी कन्नड सांस्कृतिक विभागातर्फे राजा शिवछत्रपती भवनासाठी 50 लाख रुपयांच्या निधी मंजुरीचे पत्र दिले होते. मात्र मंजूर झालेल्या निधीची पालिकेमार्फत योग्य कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे निधी परत गेला. मात्र हा निधी पुन्हा परत आणण्यात आला. त्यानंतर सदर निधीची पालिकेमार्फत कार्यवाही झाली की नाही हे गुलदस्त्यात आहे. मात्र कामास दिरंगाईप्रकरणी संबंधित कंत्राटदारावरही कारवाई होणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी पालिका बजेटमध्ये राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनासाठी केवळ तरतूद केली जाते. मात्र आवश्यक कार्यवाही होताना दिसत नाही. आपले कोणाशीही हेवेदावे नसून कोणीही करो पण सदर भवनाचे काम पूर्ण झाले पाहिजे एवढीच मागणी आहे.

भवनासमोर गाळे नको

अकोळ क्रॉसनजीकच्या विस्थापित खोकीधारकांचे पुनर्वसन झाले पाहिजे. खोकीधारकांना आपला विरोध नाही. मात्र राजा शिवछत्रपती भवनासमोर गाळे न होता बाजूच्या ठिकाणी बांधावेत. तसेच शहरात एकूण 70 गाळे हे वापराविना पडून आहेत. आधी त्यांचे नियोजन लावावे. तसेच येथे वाहन पार्किंगसाठी 60 फूट जागा असताना केवळ 25 फूट जागा सोडून संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यात आले आहे, हे चुकीचे आहे.

Related posts: