|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » लाजाँगकडून मुंबई एफसी पराभूत

लाजाँगकडून मुंबई एफसी पराभूत 

वृत्तसंस्था/ शिलाँग

 आय लीग फुटबॉल स्पर्धेतील येथील नेहरू स्टेडियमवर शनिवारी खेळविण्यात आलेल्या पाचव्या फेरीतील सामन्यात शिलाँग लाजाँगने मुंबई एफसीचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. या विजयामुळे शिलाँग लाजाँग संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचवे स्थान तर मुंबई एफसीने सहावे स्थान मिळविले आहे.

यावर्षीच्या फुटबॉल हंगामातील लाजाँगचा हा सलग दुसरा विजय असून मुंबई एफसीचा तिसरा पराभव आहे. सामन्यातील 28 व्या मिनिटाला डिकाने लाजाँगचे खाते उघडले. 42 व्या मिनिटाला  डिकाने लाजाँगचा तसेच वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत लाजाँगने मुंबईवर 2-0 आघाडी घेतली होती. 56 व्या मिनिटाला करण साहनीने मुंबई एफसीचे खाते उघडले. 70 व्या मिनिटाला चिंग्लेनसानाने लाजाँगचा तिसरा गोल नोंदवून मुंबई एफसीचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात मुंबईचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने मुंबईला या सामन्यात 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले. या सामन्यात लाजाँगला 3 गुण मिळाले.