|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महामार्गावर उद्या चक्काजाम

महामार्गावर उद्या चक्काजाम 

वार्ताहर/ निपाणी

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 31 रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी निपाणीतही चक्काजाम आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात निपाणीसह ग्रामीण भागातील सकल मराठा समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चक्काजाम आंदोलन नियोजनाच्या पार्श्वभूमीवर रविवार 29 रोजी पालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात निपाणी शहरातील मराठा बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मराठा बांधवांनी चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी 31 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलननगर हॉटेल रश्मीनजीक जमण्याचे आवाहन केले. या बैठकीत चर्चा करताना महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा बांधवांच्या मागण्यांसाठी गेल्याकाळात क्रांती मूक मोर्चे काढण्यात आला. मोठय़ा संख्येने हे मोर्चे यशस्वी करण्यात आले. असे असताना शासनाने मात्र मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलेले दिसत नाही. मुंबई येथील नियोजित क्रांती मूक मोर्चा जाहीर झालेल्या महानगरपालिका, तालुका व जिल्हा परिषद निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. यासाठी मराठा बांधवांमध्ये मागण्या पूर्णत्वासाठी असणारी आस दाखविण्यासाठी या राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

मूक मोर्चाची पुनर्रावृत्ती व्हावी

निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागाचे महाराष्ट्राशी असणारे नाते अतूट आहे. महाराष्ट्रात सुरू असलेले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी निपाणीकरांची साथ तितकीच महत्वाची ठरणार आहे. यासाठी या चक्काजाम आंदोलनात मोठय़ा संख्येने मराठा बांधवांनी उपस्थित रहावे व मागण्यांकडे लक्ष वेधावे, असे आवाहन करण्यात आले. निपाणीसह परिसरातून सुमारे 40 हजार मराठा बांधवांनी  सहभागी होताना कोल्हापूर येथील क्रांती मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले आहे. याची पुनरावृत्ती करण्यासाठी हे चक्काजाम आंदोलनही महत्वाचे आहे, असे सांगण्यात आले.

गरजूंना सहकार्य करण्याची गरज

मराठा समाजबांधव संघटित होण्यासाठी व सामाजिक प्रगतीसाठी एकसंघ होण्याची गरज आहे. यासाठी निपाणीत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी बैठक घेतली जावी. समाजाची कार्यकारिणी तयार करून समाज बांधवांना संघटित करताना गरजूंना सहकार्य करण्याची गरजही यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. बैठकीला निपाणी शहरातील मराठा समाजबांधव उपस्थित होते.

Related posts: