|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रस्थापितांना साथ की परिवर्तनाची लाट?

प्रस्थापितांना साथ की परिवर्तनाची लाट? 

या निवडणुकीत शिवसेनेकडून ‘एकटय़ाच्या ताकदी’ची अस्मिता जागवली जाणार, भाजपाकडून ‘औकाती’ची भाषा होणार, राष्ट्रवादी-काँग्रेसकडून सेना-भाजपाने एकमेकांवर केलेल्या आरोपांचेच दाखले दिले जाणार हे उघड आहे.

 

कोकणातील वातावरण हवामानातल्या उष्म्यापेक्षा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या रणधुमाळीने अधिक तापू लागले आहे. या निवडणुका स्थानिक प्रश्न व उमेदवाराभोवती एकवटलेल्या असतात, असे मानले जाते. मात्र आमदार-खासदारांचा मतदार संघातील प्रभाव जोखण्याची ‘टेस्ट केस’ म्हणूनही याच निवडणुकीकडे पाहिले जाते. राज्यातील बदलते राजकीय वातावरण पाहता या निवडणुकीत जनता प्रस्थापितांना पुन्हा साथ देते की परिवर्तनाची लाट येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मनसे, सपा, बसपा यांचे कोकणात उल्लेखनीय अस्तित्व नाही. मात्र बविआ आणि शेकापची भूमिका निकालावंर परिणाम करू शकते. सिंधुदुर्गातील लढाई राणे विरुद्ध सर्व, रत्नागिरीत सेना आणि राष्ट्रवादी आघाडी तर रायगडात राष्ट्रवादी, शेकाप आणि शिवसेना यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत. 

सिंधुदुर्गात राणेंना सोपी वाट

गत निवडणुकीत सिंधुदुर्गात जि. प.च्या 50 पैकी 33 जागांवर कब्जा करीत कॉंग्रेसने वरचष्मा राखला. येथील सर्वच राजकारण ‘राणे’ कुटुंबाभोवतीच असल्याने अप्रत्यक्षपणे राणेंचाच वरचष्मा राहिला. राष्ट्रवादीला 10, तर शिवसेना, भाजपाला पाचाचा आकडाही पार करता आला नव्हता. दरम्यान लोकसभेची ‘मोदी त्सुनामी’ आली त्यामागोमाग मोदी लाटेवर स्वार होऊन अनेक स्थानिक नेते थेट विधानसभेत पोचले. याचा राणे कुटुंबीयांनाही राजकीय फटका बसलाच. यानंतर सेनेच्या गोटात उत्साह संचारला. केसरकरांसारखा पालकमंत्री देऊन सिंधुदुर्गात शिवसेना भक्कम करण्यासाठी कंबर कसली गेली. मात्र केसरकर आपल्या मतदारसंघातील नगरपालिकातही भक्कम दिसले नाहीत. याचवेळी राणेंनी सिंधुदुर्गातच आपले लक्ष अधिक केंद्रित केले. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील संपर्क आणि आंदोलनात सातत्य राखले. निलेश राणेही स्थानिक प्रश्नांबाबत आक्रमक होत ‘फील्ड’वर उतरले. धोरणात्मक निर्णयांवर नारायण राणे यांनीही आपला प्रहार मजबूतपणे सुरू ठेवला. याचा परिणाम म्हणून नगरपालिकांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील ‘राणे पॅक्टर’वर शिक्कामोर्तब करण्यात ते यशस्वी ठरले. सेनेच्या ‘एकला चलो रे’ने राणेंची वाटचाल आणखी सोपी केली आहे. यामुळे येत्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गात काँग्रेसचा म्हणजे राणेंचाच वरचष्मा राहण्याचे संकेत मिळत आहेत.

रत्नागिरीत सेनेची सत्त्वपरीक्षा

रत्नागिरी जिह्यात सेना-भाजप युतीचा पोपट केव्हाच मेलेला होता. आता मेलेला पोपटही शिल्लक नाही, असेच म्हणावे लागेल. एका बाजूला सेना-भाजपा युतीचा काडीमोड तर विरुद्ध बाजूला आघाडीची हातमिळवणी यशस्वी होत आहे. यामुळे शिवसेनेला संधी असली तरीही झगडावे लागणार हे निश्चित. दक्षिण भागात-राजापूर, लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात शिवसेना बळकट आहे. याउलट, उत्तरेकडे-चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगडमध्ये राष्ट्रवादी मजबूत आहे. खेडमध्ये शिवसेना उतरणीला लागलेली आहे. यामुळे ढोबळमानाने ही लढाई एकटी सेना विरुद्ध एकवटलेली आघाडी यांच्यामध्ये होणार हे स्पष्ट आहे. रत्नागिरीतील शिवसेनेंतर्गत ‘जुने-नवे’ शीतयुद्ध, काही भागात बळावलेली बंडखोरीची शक्यता सेनेची डोकेदुखी ठरू शकते.

अंतर्गत कुरबुरी थांबणार की…?

रत्नागिरी व राजापूरच्या आमदारांमधील ‘एकोप्या’चा परिणामही उत्तर भागामध्ये जाणवू शकतो. ‘आघाडी संदर्भात काँग्रेसमध्ये बोलायचे कोणाशी’ असा प्रश्न विचारून भास्कर जाधवांनी टाकलेली काडी, त्याला ‘द्वितीय-तृतीय फळीतील नेतृत्वाशी’ बोलण्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे करून निलेश राणेनी दिलेली हवा कोणत्या दिशेने जाते हे पाहणे उत्सुकतेचे आहे. जिह्यात ठरवीक
‘पॉकेट्स’मध्ये भाजपाची ताकद आहे. काही ठिकाणी ते विजयापर्यंत पोचू शकतात. अन्यत्र जिंकण्याची नसली तरी पाडण्याची क्षमता भाजपाची नक्की आहे. याचा फटका सेनेला बसतो की आघाडीला हे पहावे लागेल. बदललेल्या आरक्षणामुळे काहींची गणिते बिघडलेली आहेत. चिपळुणात रमेश कदमांचा पक्षप्रवेश, पंचायत समिती सभापतींनी दिलेला राजीनामा राजकारणाला कोणती दिशा देतात हे पहावे लागेल.

आमदारांचे वर्चस्व पणाला

मागील निवडणुकीत शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या 57 पैकी जेमतेम निम्म्या तर भाजपाला 7 जागांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादीने 19 तर काँग्रेसनेही 3 ठिकाणी अस्तित्व राखले होते. रत्नागिरी जिह्यात ‘बहुजन विकास आघाडी’ ची सामाजिक ताकद नेहमीच कोणाच्यातरी दावणीला बांधली गेल्याने विखुरलेली आहे. या ताकदीचे धुवीकरण झाल्यास राजकीय गणिते बदलू शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. भाजपा काही ठिकाणी उमेदवारीसाठी बंडखोरांच्या प्रतीक्षेत आहे. दक्षिण भागात आघाडी तर उत्तर भागात सेना आगेकुच करण्याची शक्यता आहे. तुरळक स्वरुपात भाजपाचे उमेदवारही आपले अस्तित्व राखतील. जिह्यातील आमदारांना आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी निकराचे प्रयत्न करावेच लागणार आहेत.

रायगडात तटकरेंना अखेरची संधी

रायगडमध्ये गत निवडणुकीत कोणालाही एकहाती यश मिळाले नव्हते. शेकापशी जुळलेले सुत, घरातील वाद मिटवण्यात आलेले यश राष्ट्रवादीच्या पदरात माप टाकणारे आहे. पुढच्या पिढीला रिंगणात उतरवून टाकलेला नवा डाव सुनील तटकरेंच्या प्रतिष्ठेची कसोटी पाहणारा असेल. मात्र सेनेचे प्राबल्य या जिह्यातही वाढत आहे, भाजपही आपले फासे टाकत आहे या बाबी दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

कार्यक्रम नसलेल्या पक्षांची साठमारी

या निवडणुकीत शिवसेनेकडून ‘एकटय़ाच्या ताकदी’ची अस्मिता जागवली जाणार, भाजपाकडून ‘औकाती’ची भाषा होणार, राष्ट्रवादी-काँग्रेसकडून सेना-भाजपाने एकमेकांवर केलेल्या आरोपांचेच दाखले दिले जाणार हे उघड आहे. यातून राजकीय वातावरण उत्तरोत्तर तापत जाणार आहे. राजकारणाच्या या साठमारीत स्थानिक प्रश्न, विकासाचे मॉडेल आणि योजना केव्हाच बासनात बांधण्यात आलेल्या आहेत. विकासाची कोणतीही दिशा नसलेल्या राजकीय पक्षांना मतदार राजा कसा कौल देतो याकडेच आता सर्वांचे लक्ष
आहे.

Related posts: