|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कारच्या धडकेत रस्ता ओलांडणारा तरुण ठार

कारच्या धडकेत रस्ता ओलांडणारा तरुण ठार 

कणकवली : महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची धडक बसून शहरातील गजानन महादेव मुंज (52, रा. कणकवली, किनई रोड, मसुरकर चाळ) हे जागीच ठार झाले. हा अपघात महामार्गावर हुंबरट येथे हॉटेल इंद्रायणी समोर बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास झाला. गजानन यांना बसलेली धडक एवढी जोरादार होती, की यात त्यांच्या डोक्याचा भाग गाडीवर आदळून अक्षरशः फुटला होता. धडकेनंतर ते महामार्गावरच विव्हळत पडले होते. त्यांना तातडीने अपघातग्रस्त कारमधूनच येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

गजानन मुंज हे गेली अनेक वर्षे खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करीत होते. सध्या ते तेथीलच वाय. डी. सावंत यांच्या डंपरवर चालक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते सावंत यांना भेटण्यासाठी हुंबरट येथे गेले होते. या दरम्यान हॉटेल इंद्रायणीजवळ महामार्ग ओलांडत असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने येत असलेला ट्रक पाहून ते महामार्गावरच थांबून एक पाऊल मागे सरकले. या दरम्यान तो ट्रक कणकवलीच्या दिशेने निघून गेला. मात्र, ट्रकच्या मागाहून वेगाने येत असलेल्या कारची (एमएच07 क्यू 9001) गजानन यांना जोरदार धडक बसली. यात गजानन हे ठार झाले.

                      डोक्याला जबरदस्त मार

ही धडक एवढी जबरदस्त होती की, गजानन यांचे डोके चारचाकीच्या समोरील काचेच्या बाजूला गाडीवर जोराने आदळल्याने ते सुमारे 20 फूट महामार्गावर पुढे फेकले गेले. तर डोक्याचा भागही काही प्रमाणात फुटला होता. कारची समोरील काच फुटून नुकसान झाले होते. नंतर कार चालक कौस्तुभ पाटणकर यांनी गाडी काही अंतरावर थांबवत अपघातस्थळी धाव घेतली. तेथील ग्रामस्थ बाळा परब, उमेश परब, प्रकाश दळवी, इस्माईल शेख आदींनी धाव घेत गजानन यांना रुग्णालयात हलविले. त्यानंतर पाटणकर हे कारसह पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले.

                  महामार्गावर रक्ताचा सडा

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गजानन हे महामार्गावर जेथे पडले होते, तेथे रक्ताचा सडा पडला होता. तर त्यांची चप्पल महामार्गावर इतरत्र पडली होती. त्यांना त्याच चारचाकीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, अपघाताची खबर वाय. डी. सावंत यांनी दिली असून त्यानुसार कारचालक कौस्तुभ पाटणकर (कुडाळ-शिवाजीनगर) याच्यावर भा. दं. वि. कलम 304 (अ), 279, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                   अनेकांची उपजिल्हा रुग्णालयात धाव

शहरातील हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून गजानन यांची ओळख होती. त्यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध होते. गेली अनेक वर्षे ते चालक म्हणून कार्यरत असल्याने येथील ट्रक, टेम्पो चालक, मालकांशीही त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्यावर दुपारी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे, महेंद्र सांब्रेकर, चेतन अंधारी, अनिल मुंज, चेतन मुंज, महेश सावंत आदींसह अनेकांनी धाव घेतली. गजानन यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहिणी असा परिवार आहे.  कनेडी येथील हॉटेल व्यावसायिक प्रकाश व कार मेकॅनिक प्रसाद मुंज यांचे ते बंधू होत.