|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गांधीजी जगाने निवडलेले सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व!

गांधीजी जगाने निवडलेले सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व! 

कणकवलीगत सहस्त्रकातील श्रेष्ठ व्यक्तिमत्वांची निवड करण्याचे जगाने ठरविले तेव्हा अल्बर्ट आईन्सस्टाईन व महात्मा गांधी ही दोनच नावे अंतिम निवडीपर्यंत पोहोचली होती. अखेरीस आईन्सटाईनला काही मतं जादा मिळाली होती. पण त्याच आईन्सटाईनने ‘कदाचित काही पिढय़ानंतर गांधीजी नावाचे थोर व्यक्तिमत्व जन्माला आले होते, ही जगाला दंतकथा वाटेल’ असे गांधीजींविषयी आदराने उद्गार काढले होते. महात्मा गांधींचे हे मोठेपण आपण समजून घ्यायला हवे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी काढले.

कोकणचे गांधी स्व. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या वागदे येथील गोपुरीत ‘गांधी समजून घेताना’ या कार्यक्रमात डॉ. अवचट बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिंधुरत्न फाऊंडेशनचे डॉ. मिलिंद कुलकर्णी, संत वाङमयाचे अभ्यासक ऍड. देवदत्त परुळेकर, पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते ऍड. संदीप निंबाळकर, गोपुरी आश्रम समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते. डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थितांच्यावतीने डॉ. अवचट यांच्याशी संवाद साधला.

डॉ. अवचट म्हणाले, मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला आदी जागतिक पातळीवरचे नेते हे गांधीजींना गुरू मानत. गांधी हत्येचे वृत्त ऐकून युरोपातील एका देशात असलेले मधु लिमये सैरभर झाले. सैरभैर अवस्थेत ते रस्त्यावरून फेऱया मारत होते. तेव्हा एक युरोपीयन माणूस त्यांच्याकडे आला आणि त्याने लिमये यांना विचारले ‘आर यू इंडियन?’ त्यावर लिमये यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यावर त्यांच्या शर्टाला धरत गदागदा हलवीत त्या युरोपियनने मधु लिमयेंना विचारले ‘व्हाय यू किल्ड गांधी?’ ‘तुम्ही गांधींना का मारले?’ ‘गांधी काय तुमच्या एकटय़ाचे होते काय?’ ‘आमच्या गांधींना का मारले तुम्ही?’ असं तो युरोपीयन विचारत होता. इतके गांधीजी महान होते.

जगाच्या राजकारणात आज जी काही आंदोलने, संघर्ष चालला आहे, त्यावर गांधीजींचा प्रभाव आहे. अगदी कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसण्याच्या घटनेवरही गांधी विचारांचा प्रभाव आहे. भारताने जगाला काय दिले? जगाला भारताने गांधीजी दिले, ही खूप महान गोष्ट आहे, हे आपण कदापिही विसरता कामा नये.

समाजमाध्यमे ः आभासी जग

सध्याच्या वाढत्या चंगळवादाशी संबंधित प्रश्नांवर डॉ. अवचट म्हणाले, कबिरानेच आपल्या दोहय़ामध्ये सांगून ठेवलंय की नावेमध्ये पाणी आणि घरामध्ये धन भरणे म्हणजे धोकादायक असते. नावेत अधिक पाणी भरले की नाव बुडते. तसे घरात अधिक धन झाले, तर घरही बुडण्याचा धोका असतो. यासाठी ‘गरजे इतकेच’ हा गांधी विचार समजून घ्यायला हवा. आज फेसबूक, व्हॉट्सऍप अशा समाजमाध्यमांवर शेकडो, हजारो मित्र आहेत. प्रत्यक्षात मात्र, आपले म्हणता येतील, अशी चार नावेही मित्र म्हणून सांगता येत नाहीत. शेजारच्या ब्लॉकमध्ये कोण राहतो, त्याचे साधे नाव माहीत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे ‘फेसबूक फ्रेंड’ हे आभासी जग आहे. या आभासी जगाबद्दल सावधानता बाळगायला हवी, असेही डॉ. अवचट म्हणाले.

‘गांधी समजून घेताना’ या कार्यक्रमाचे आयोजन ऍड. देवदत्त परुळेकर, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले होते. आभार प्रा. मुंबरकर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. नितीन शेटये, सौ. मंगलताई परुळेकर, संकल्प प्रतिष्ठानचे मुरादअली शेख, व्ही. के. सावंत, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रसाद घाणेकर, अर्पिता मुंबरकर, विजया चिंडक आदी उपस्थित होते.

Related posts: