|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उत्तरप्रदेशच्या पहिल्या टप्प्यासाठी 839 उमेदवार

उत्तरप्रदेशच्या पहिल्या टप्प्यासाठी 839 उमेदवार 

143 जण कलंकित, 302 जण कोटय़धीश

वृत्तसंस्था/  लखनौ

 उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता 839 उमेदवार मैदानात आहेत. या उमेदवारांपैकी 143 जणांवर गंभीर गुन्हे नोंद असून 302 उमेदवार कोटय़धीश असल्याची माहिती उत्तरप्रदेश इलेक्शन वॉच आणि एडीआरच्या अहवालातून समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात 15 जिह्यातील 73 मतदारसंघांमध्ये 11 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

आगरा दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नजीर अहमद यांनी आपली संपत्ती 211 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नमूद केले आहे. यानंतर मथुराच्या मांट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सतीश कुमार शर्मा हे या प्रकरणी दुसऱया स्थानी आहेत. त्यांनी आपली संपत्ती 114 कोटी रुपयांपेक्षा अधिक दाखविली आहे. तिसऱया क्रमांकावर भाजपच्या राणी पक्षिलिका सिंग यांचे नाव असून त्यांनी 58 कोटीपेक्षा अधिक संपत्ती घोषित केली आहे. त्या आगरातून निवडणुकीला उभ्या ठाकल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात 5 कोटीपेक्षा अधिक संपत्ती असणारे 119 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2 ते 5 कोटीदरम्यान संपत्ती असणारे 103 उमेदवार, 50 लाख ते 2 कोटीवाले 167 जण आणि 10 लाख ते 50 लाख रुपयांदरम्यान संपत्ती दर्शविलेले 203 उमेदवार आहेत.

पहिल्या टप्प्यात बसपचे 90 टक्के, भाजपचे 84 टक्के, सपचे 78 टक्के आणि काँग्रेसचे 72 टक्के उमेदवार कोटय़धीश आहेत. 52 टक्के उमेदवारांनी आपला प्राप्तिकर तपशील नमूद केलेला नाही.

सर्वाधिक कलंकित बसपचे

सर्वाधिक कलंकित उमेदवार बसपतर्फे उभे आहेत. 73 उमेदवारांपैकी 26 म्हणजेच 36 टक्के उमेदवारांवर गंभीर गुह्यांचे खटले नोंद आहेत. यानंतर भाजपचे 30 टक्के उमेदवार, रालोद आणि सपच्या 26 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील 15 जणांवर हत्या आणि 24 उमेदवारांवर हत्येच्या प्रयत्नाचा खटला सुरू आहे. 26 मतदारसंघांना संवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या मतदारसंघांमध्ये 3 पेक्षा अधिक कलंकित उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Related posts: