|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोली शिवसेनेत ‘गृहकलह’ उफाळला

दापोली शिवसेनेत ‘गृहकलह’ उफाळला 

दापोली / प्रतिनिधी

दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची पकड राहणार की माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची, असा प्रश्न शिवसेना नेतृत्वासमोर उभा राहिला. यावर सेना नेतृत्वाने याविषयी निर्णय घेतला असून कदम-दळवी वादात रामदास कदम यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. दुसऱया बाजूला संतप्त दळवी समर्थकांनी दिलेले राजीनामे मागे घेण्यासाठी कोणतीही सूचना न करता त्यांचे राजीनामे एकदम मंजूर करण्याची पाऊले ‘मातोश्री’वरून उचलली गेली आहेत. यामुळे दळवी समर्थकांना बाजूला सारत कदम समर्थकांना बळ देण्याचे धोरण स्पष्टपणे स्वीकारण्यात आले आहे. त्याचवेळी पक्षात राहून गद्दारांना धडा शिकविणार असल्याचे दळवी यांनी जाहीर केल्याने दापोली-मंडणगडात वेगळे निवडणूक महाभारत जनतेला पहायला मिळणार आहे.

  शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम यांनी जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीवरून दापोली-मंडणगड तालुक्यातील शिवसेना पक्षात नाराजी उफाळून आली होती. त्यानंतर दापोली-मंडणगड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी आपल्या पदांचे जे राजीनामे मातोश्रीवर पाठवले होते. त्यामध्ये प्रामुख्याने दळवी समर्थकांचा भरणा होता. पाठवण्यात आलेले सर्व राजीमाने मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय नवीन उपजिल्हाप्रमुख म्हणून सुधीर कालेकर व तालुकाप्रमुखपदी प्रदीप सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मातोश्रीने हे राजीनामाप्रकरण गंभीरपणे घेतले असल्याचे समोर आले आहे.

  मंडणगड व दापोलीच्या पदाधिकाऱयांनी राजीनामा दिल्यावर त्यांना मातोश्रीवर बोलावून त्यांचे म्हणणे उध्दव ठाकरे यांनी ऐकून घेतले व संपर्कप्रमुखांना या बाबत अहवाल सादर करण्यात सांगण्यात आले. यानंतर संपर्कप्रमुखांच्या सहीने सुधारित यादी जाहीर करण्यात आली. ती मान्य असल्याचे दळवी गटाकडून जाहीर करण्यात आले. या वादात संघर्ष न करता ‘मातोश्री’चे आदेश मान्य करण्याचे दळवी गटाने ठरवले. पक्षांतर्गत संघर्षात दळवी समर्थकांचे हे पांढरे निशाण असल्याचे मानण्यात येत आहे. दळवी समर्थकांनी पांढरे निशाण दाखवताच संघटना नेत्यांनी दळवींना बाजूला ठेवत शनिवारी रात्री उशिरात तिसरी सुधारित यादी विजय कदम यांनी स्वत:च्या सहीने प्रसारित केली.

 दळवी गटाला फणसे व गोवले या दोन उमेदवारांबद्दल आक्षेप होता, त्यांची नावे तिसऱया सुधारित यादीत समाविष्ट करण्यात आली होती. ही यादी आता अंतिम यादी असल्याचे संपर्क प्रमुख विजय कदम यांनी दूरध्वनीवरून बोलताना स्पष्ट केले. यामुळे दळवी गटाला जोरदार झटका बसल्याचे मानण्यात येत आहे.

 संपर्क प्रमुख विजय कदम यांनी शनिवारी रात्री जाहीर केलेली सुधारित यादी पुढीलप्रमाणे-

केळशी-रेश्मा झगडे, पालगड-श्रावणी गोलांबडे, हर्णै-विवेक भावे, जालगाव-चारूता कामतेकर, असोंड-अनंत करबेले, बुरोंडी-प्रदीप राणे. तर पंचायत समितीच्या उमेदवारांची सुधारित यादी पुढीलप्रमाणे. केळशी-अनन्या रेवाळे, अडखळ-ऐश्वर्या धाडवे, खेर्डी-स्नेहा गोरिवले, हर्णै-महेश पवार, गिम्हवणे-रूपाली बांद्रे, जालगाव-मंगेश पवार, टेटवली-भावना धामणे, उन्हवरे-मनीषा खेडेकर, बुरोंडी-दीपक घडशी, दाभोळ-संतोष आंबेकर, पालगड-राजेंद्र फणसे व असोंड-वृषाली सुर्वे आदी उमेदवारांचा अंतिम यादीत समावेश करण्यात आला आहे.   

 यामुळे दापोली तालुक्यातील शिवसेनेतील ‘गृहकलह’ विकोपाला गेला असल्याचे बोलले जात आहे. पक्षात राहून गद्दारांना धडा शिकविण्याचे धोरण माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जाहीर केले असल्याने आगामी निवडणुकीचे महाभारत दापोली-मंडणगड तालुक्यात लक्षणीय ठरणार आह. दरम्यान दुपारी तिसऱया यादीत नावे जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज वाजत-गाजत रॅली काढून दाखल केले.

चौकट

पक्षात राहून गद्दारांना धडा शिकवणार

या बाबत दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याशी सपर्क साधला असता पक्षाने आता आम्हाला विश्रांती दिली आहे, असे सूचक उद्गार काढले. तसेच आपण गेली 26 वर्ष खपून पक्ष वाढवला. त्या पक्षाला खेड तालुक्याप्रमाणे शिवसेना संपवण्याचे काम रामदास कदम यांनी हाती घेतले आहे. मात्र आपण पक्षात राहूनच या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही, अशी भूमिका माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

 

Related posts: