|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘तरुण भारतच्या कौतुक सोहळय़ा’ने बँक कर्मचाऱयांचा दुणावला उत्साह

‘तरुण भारतच्या कौतुक सोहळय़ा’ने बँक कर्मचाऱयांचा दुणावला उत्साह 

प्रतिनिधी / सातारा

काश्मीरच्या सीमेवर लढणारा जवान पाहिला की भले मनाने का होईना आपण त्याला सॅल्युट करतो अशीच अर्थक्रांती देशात घडली ती नोटाबंदीच्या काळात. त्यावेळी सलग पन्नास दिवस या अर्थक्रांतीसाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी झटत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात नोटाबंदी जाहीर केली तेव्हाच अन्य दोन-तीन देशांनीही नोटा बंदी जाहीर केली मात्र त्या देशातील व्यवस्थापनच कोलमडल्याने अखेर नोटाबंदी या देशांना मागे घ्यावी लागली. मात्र भारतात नोटाबंदी यशस्वी झाली ती फक्त बँकर्समुळे ! त्यांनी आपल्या कामातून कष्टातून देशप्रेम दाखवले असे सामाजिक काम करणाऱयांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांचे कौतुक करण्यात ‘तरुण भारत’ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. नोटाबंदी नंतर देशात प्रथमच असा कौतुक सोहळा ‘तरुण भारत’ने केल्यामुळे अनेक बँक अधिकारी व कर्मचारी भारावून गेले.

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत बँक कर्मचाऱयांचा कौतुक सोहळा ‘तरुण भारत’तर्फे आयोजित केला होता. यावेळी साताऱयातील प्रसिध्द गायक विरेंद्र केंजळे यांच्या गितांची मैफील असलेल्या साज या कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. बँक कर्मचाऱयांचा सत्कार तसेच बँक कर्मचाऱयांसाठी लकी ड्रॉ पध्दतीने काढलेली बक्षिसे व त्याला विरेंद्र केंजळेच्या गीतांच्या मैफीलीचा साज या त्रिवेणी संगमामुळे कार्यक्रम हळूहळू बहरत गेला व 6 ते 9 या वेळेचा हा कार्यक्रम कधी 6 ते 11 वाजेपर्यंत लांबला.

यावेळी, खरचं आपण इतके काम केले हे ‘तरुण भारत’मुळे समजले अशी प्रतिक्रीयाही अनेक बँकर्सने प्रांजळपणे दिली. तर काहींना या कौतुक सोहळय़ामुळे ते पन्नास दिवस डोळय़ासमोर उभे राहिले.

आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी मोजक्या पण तितक्याच मनाला स्पर्शून जाणाऱया आपल्या सहा मिनिटांच्या भाषणात सैनिकांनी पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा नकळतपणे आपण प्रत्येक भारतीयांनी जवानांना सॅल्युट केला, परंतु काळया पैशाच्या विरोधात जो सर्जिकल स्ट्राईक देशांतर्गत झाला त्यावेळी अग्रभागी लढायला होते ते बँकेचे कर्मचारी.त्यांनी अर्थक्रांती यशस्वी करण्यासाठी जे परिश्रम घेतले यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप कौतुकाची सुरूवात ही सातारसारख्या क्रांतीभूमीतून होत असल्याचे सांगितले. यावेळी अनेक बँक कर्मचाऱयांच्या डोळय़ाच्या कडा पाणावल्या. यावेळी प्रभावळकर यांनी आमचे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी आम्हाला आखून दिलेल्या सामाजिक कार्यावरूनच आम्ही चालत जात असल्याने आम्हाला हा कौतुक सोहळा करावा वाटला.

 यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी सुजीत शेख यांनी ‘तरुण भारत’च्या या अनोख्या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक रूपयांचा घोटाळा नसताही अनेकजण टिका करत होते. त्यावेळी सत्यता काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे मांडण्याचे धाडस केवळ ‘तरुण भारत’ने केले होते व आजच्या बँकर्सच्या कौतुक सोहळय़ामुळे तर ‘तरुण भारत’ने केवळ डीसीसी लाच नव्हे तर संपुर्ण बँक क्षेत्रालाच जिंकल्याचे सांगितले.

यावेळी बालीजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, पु.ना गाडगीळचे शाखा व्यवस्थापक निकम, महाराष्ट्र बँकेचे उपसहप्रबंधक अहिलाजी थोरात, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, रामगडिया, जायंटस ग्रुपचे अध्यक्ष अमोल सणस या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ‘तरुण भारत’चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, जाहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, वितरण प्रमुख प्रकाश सामंत यांनी केले. यावेळी विविध बँकेचे अधिकारी कर्मचारी त्यांचे परिवार व त्यांच्या सोबत टीम तरुण भारत आपल्या परिवारासह हजर होती.

कौतुक सोहळय़ाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी शिवानी मंत्री यांनी केले. यावेळी त्यांनीही नोटाबंदीच्या काळात बँक कर्मचाऱयांच्या विविध समस्यांना आपल्या शैलीतून हात घातला.