|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विज्ञान ग्रंथालय उद्घाटनात ‘आजीच्या गोष्टी’

विज्ञान ग्रंथालय उद्घाटनात ‘आजीच्या गोष्टी’ 

कणकवली : आपल्या बालपणातील आजीच्या गोष्टी ऐकणे आणि त्यात रममाण होणे ही  आयुष्यातील मोठी आनंदाचीच घटना असते. मात्र, आजच्या टीव्ही, संगणकाच्या युगात आजीच्या गोष्टीच हरवल्याचा अनुभव घ्यावा लागतोय. अशाच या काळात लहान मुलांनी आजीच्या अनेक गोष्टी ऐकल्या…त्यातून त्यांचे प्रबोधनही झाले आणि मनोरंजनही. निमित्त होते, ते येथे आयोजित सिंधुदुर्गातील पहिल्या विज्ञान ग्रंथालय उद्घाटनाचे.

युरेका सायन्स क्लबच्या सौ. सुषमा केणी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या ग्रंथालयाचे उद्घाटन शहरातील विज्ञान चळवळ सुरू राहवी, यासाठी कार्यरत असलेल्या सुरेश कोदे सायन्स फोरमच्या चित्रा सुरेश कोदे आणि शकुंतला गोविंद घाणेकर, मनीषा मालवणकर, विमल ठाकुर-देसाई या आजींच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कोणतेही भाषण न करता उपस्थित मुलांना गोष्टी सांगून बालपणातील आजीच्या गोष्टींना उजाळा दिला. यावेळी सौ. केणी यांच्यासह सुरेश कोदे सायन्स फोरमचे डॉ. नीलेश कोदे, डॉ. मकरंद काजरेकर, शपुंतला वाळके, संदीप राणे आदींसह बहुसंख्येने पालक आणि मुले उपस्थित होती.

शकुंतला गोविंद घाणेकर यांनी ‘लगेच तोडता येते पण जोडता येत नाही’ हा विचार मुलांनी कायम लक्षात ठेवावा, असे सांगून गोष्ट कथन केली. चित्रा सुरेश कोदे यांनी माणसाच्या आयुष्यात पुस्तकाचे महत्व मोठे असते. त्यामुळे कायमच पुस्तकांच्या संगतीत राहून पुस्तके वाचली पाहिजेत, असे सांगत गोष्ट सांगितली.

सौ. केणी म्हणाल्या, मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, वाचनाची गोडी निर्माण व्हावी, कल्पकता वाढावी आणि त्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागावी, यासाठी सिंधुदुर्गातील पहिले हे विज्ञान ग्रंथालय कणकवली येथे सुरू करण्यात आले. बालगट ते किशोरवयीन मुले, पालक, शिक्षक व विज्ञानप्रेमींसह सर्व माध्यमांसाठीही ग्रंथालय सुरू राहणार आहे. यात गणित, खगोलशास्त्र, जनरल नॉलेज, वैचारिक व वैज्ञानिक विषय, भरपूर विविध मराठी व इंग्रजी पुस्तके व विज्ञानविषयक मराठी व इंग्रजी मासिके ठेवण्यात आली आहेत.  स्पर्धा परीक्षा, प्रकल्प, संदर्भग्रंथांची पुस्तकेही आहेत. ग्रंथालयातर्फे हसत-खेळत विज्ञान, मनोरंजनातून विज्ञान समजावून देणे, रंजक वैज्ञानिक प्रयोग, विज्ञानाच्या गंमती-जमती, चर्चासत्रे, विविध पर्यावरणपूरक उपक्रम तसेच गरजेनुसार एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून संकल्पना स्पष्ट केल्या जाणार आहेत.