|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पूर्वजन्मी पाप केले

पूर्वजन्मी पाप केले 

चोखोबांच्या मनाला हा प्रश्न छळत होता की हे दु:ख, या वेदना माझ्याच वाटय़ाला कां? माझा अपराध तरी कोणता? या प्रश्नाचे गाऱहाणे त्यांनी समाजापाशी मांडले, देवाकडे तक्रार केली. पण चोखोबांच्या प्रश्नाला ना उत्तर होते समाजापाशी, ना उत्तर होते देवापाशी! मग चोखोबा आपल्याच मनात या प्रश्नाचे उत्तर शोधू लागले. खूप विचार करूनही काही उत्तर सापडत नव्हते. शेवटी चोखोबांच्या मनाने हजारो वर्षांच्या धर्म परंपरेने दिलेले उत्तर स्वीकारलेले दिसते. माझ्याच वाटय़ाला हे दु:ख कां? या प्रश्नाचे चोखोबांच्या मनाने स्वीकारलेले उत्तर त्यांनी एका अभंगात व्यक्त केले आहे ते असे –

कृष्ण निंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ।

चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ। आपण या जन्मात भोगत असलेले दु:ख, वेदना हे आपल्या हातून घडलेल्या पूर्वजन्मीच्या पापाचे फळ आहे हा विचार संतांच्या अभंगात अनेकवेळा आलेला आहे. ज्ञानेश्वर माउली एका ‘आंधळा’ या रुपकात्मक अभंगात म्हणतात – पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले। विषयसुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले। चौऱयांशी लक्ष योनि फिरता दु:ख भोगिले। ज्ञानदृष्टि हारपली दोन्ही नेत्र आंधळे । आंधळय़ाच्या वाटेला आलेला दु:खमय संसार कसा आहे याचे वर्णन माउली पुढे करतात – संसार दु:खमूळ चहुकडे इंगळ। विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ। कामक्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ। आणखी एका अभंगात पांगळय़ाच्या रुपकात माउली म्हणतात – पूर्वप्राप्ती दैवयोगे पंगु झालो मी अज्ञान। विषय बुंथी घेऊनिया त्याचे केले पोषण। ज्ञानेश्वर माउली व चोखोबा हे समकालीन आहेत. सुमारे 750 वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे मूल्यमापन आणि विचारांची चिकित्सा करताना आपण आधुनिक काळाचे निकष लावले तर ते अन्यायकारक ठरेल. त्याकाळी सर्व ज्ञान संस्कृत भाषेतील केवळ धार्मिक ग्रंथात साठवलेले होते. आणि त्याची दारे बहुसंख्य स्त्री, शुद्रादिकांना बंद होती. अशा परिस्थितीत चोखोबांनी व बहुसंख्य जनतेने परंपरेने दिलेले आपल्या दु:खाचे कारण पूर्वजन्मीचे पाप हे स्वीकारले. आता या दु:खातून मुक्त व्हायचे असेल तर पूर्वजन्मीच्या पापकर्माच्या परिणामातून मुक्ती मिळवायला हवी. ती कशी मिळवायची हा पुढचा प्रश्न होता. याला पुरोहितशाहीने उत्तर दिले की त्यासाठी प्रायश्चित्त घ्यायला हवे. त्यासाठी पूजा, अर्चा, नागबळी, गोदाम, धन दान इत्यादी विधी करायला हवेत आणि या सर्वांची दक्षिणा द्यायला हवी. दान द्यायचे ते पुरोहितांना आणि वरती दान स्वीकारल्याबद्दल दक्षिणाही द्यायची तीदेखील पुरोहितांना! या विक्षिप्त अटीमुळे निर्माण झालेला एक खास प्रसंग पुराणात वर्णिला आहे. राजा हरिश्चंद्राने आपले सारे राज्य आणि संपत्ती विश्वामित्राला दान दिली. त्यानंतर ते दान स्वीकारण्यासाठी विश्वामित्राने दक्षिणा मागितली. निर्धन झालेल्या हरिश्चंद्राला ही दक्षिणा देण्यासाठी स्वतःलाच विकावे लागले.

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: