|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जावलीत निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज

जावलीत निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज 

प्रतिनिधी /मेढा

जावली तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी भरारी पथेक, स्थिर सर्व्हेक्षण पथक तसेच स्वातंत्र्य निवडणूक कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

जावली तालुक्यामध्ये तीन जिल्हापरिषद गट व सहा पंचायत समिती गण यांच्यासाठी निवडणुक होत आहे. त्यासाठी 150 मतदान केंद्रासाठी 20 झोनल अधिकारी तर 990 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये 84515 मतदार असून त्यामध्ये 42536 पुरूष व 41979 महिला मतदार असून ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी तीनशेतीस मतदार यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. उमेदवारांनी मात्र मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा व मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन  नाटेकर यांनी केले आहे.

कुडाळ, सायगाव, म्हसवे आणि खर्शी तर्फे कुडाळ ही मतदान केंद्रे अती संवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला पाच लाख आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला साडेतीन लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या दिवसांपासून दररोजचा खर्च तपशिलवार दुसऱया दिवशी देणे बंधनकारक आहे.

आचार संहिता कक्षाचे प्रमुख गटविकास अधिकारी गजानन भोसले यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच आचारसंहितेचे काटेकरपणे पालन करण्यासाठी तीन दिवस व तीन रात्रीसाठी भरारीपथके निर्माण करण्यात आली आहेत. याशिवाय फिरते पथक स्थिर सर्व्हेक्षण पथक बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. हि 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार असून 23 फेब्रुवारीला पंचायत समितीच्या बाबासाहेब आखाडकर सभागृहात सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही कंबर कसली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास कठाळे, उपनिरीक्षक झांजुर्णे व पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.