|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा धडाका

बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा धडाका 

प्रतिनिधी/ निपाणी

गेल्या दोन आठवडय़ांपासून बेशिस्त वाहनधारकांवर बसवेश्वर पोलिसांतर्फे कारवाईचा धडाका सुरू आहे. परवाना नसलेल्या, आवश्यक कागदपत्रे नसलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. लोकअदालतच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे. वाहनचालवताना परवाना तसेच वाहनाची आवश्यक कागदपत्रे बाळगण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षात निपाणीसह परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 2015 मध्ये मृत्यूची घटना घडलेल्या अपघात 32 तर गंभीर पण मृत्यू न झालेले अपघात 61 होते. तसेच 2016 मध्ये मृत झालेले अपघात 38 तर अन्य गंभीर स्वरूपाचे 63 अपघात झाले आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तर जणू अपघातांची मालिकाच सुरू आहे. निपाणी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात 2015 मध्ये 33 तर 2016 मध्ये एकूण 39 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आतापर्यंत विशेष अशी पावले उचलण्यात आली नाहीत.

मात्र आता लोकअदालतीच्यानिमित्ताने पोलिसांकडून बेशिस्तपणे वाहन चालवणारे वाहनधारक, परवाना किंवा अन्य कागदपत्रे नसणारे वाहनधारक यांना अडवून त्यांच्यावर 100 रुपये व 200 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जात आहे. विशेषतः बसवेश्वर पोलीस स्थानकातर्फे अशाप्रकारची मोहीम जोरदारपणे राबविण्यात येत आहे. त्यामध्ये एपीएमसी कार्यालय, अकोळ क्रॉस व बसस्थानक परिसरात ही कारवाई सुरू आहे. असे असले तरी काही वाहनधारक मात्र वशिल्याचा वापर करत आपली सुटका करून घेत आहेत.

वाहनधारकांनी नियम पाळणे गरजेचे

वाहनधारकाने वाहन चालवताना परवाना आवश्य बाळगला पाहिजे. तसेच गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र, प्रदूषनविरहीत प्रमाणपत्र व हेल्मेटचावापर करणे बंधनकारक आहे. असे न करणाऱयांवर कारवाईचा अधिकार असल्याने बसवेश्वर पोलिसांतर्फे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.

पोलिसांकडून युवकांना टार्गेट

बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करताना पोलिसांकडून शिस्त मोडली जात असल्याच्या तक्रारी वाहनधारकांतून होत आहेत. त्यामध्ये वाहन अडवून वाहनधारकांच्या वयोमर्यादेचे भार न ठेवता वाहनाची चावी जबरदस्तीने काढून घेणे, परवाना नसलेल्या महाविद्यालयीन युवतींवर कारवाई न करता केवळ युवकच टार्गेट करणे आदी प्रकारामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

शिस्त लागण्यासाठी कारवाई

याबाबत फौजदार एम. बी. बिरादार म्हणाले, परवाना तसेच आवश्यक कागदपत्रे नसलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येत असून कोणालाही यातून सूट देण्यात आलेली नाही. वाहनधारक तसेच वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे. तसेच यापुढेही ही कारवाई होणार असून वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.