|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » टेन्शन फ्री धम्माल कॉमेडी ः गेला उडत

टेन्शन फ्री धम्माल कॉमेडी ः गेला उडत 

कुडाळ : केदार शिंदे यांचे नाटक आणि भद्रकाली आणि थर्ड बेल प्रॉडक्शनची निर्मिती यातच ‘गेला उडत’ हे नाटक किती धम्माल मनोरंजन देणारे असेल, याची प्रचिती येते. नाटक पाहताना मनोरंजनासाठी पराकोटीच्या कल्पना असू शकतात, याचाही अंदाज येईल. केदार शिंदे आणि सिद्धार्थ जाधव हे विनोदाचे समीकरण परत एकदा येथे पाहताना अक्षरशः धम्माल पोट धरून हसायला लावते.

स्वतःजवळ अद्भूत शक्ती असल्याची मारुती (सिद्धार्थ जाधव) या तरुणाची मानसिक धारणा आहे. त्यातून तो स्वतःला ‘मारुतात्मज’ असे म्हणवून घेतो. या शक्तीचा वापर करून तो परिवाराला समस्यांच्या फेऱयांतून बाहेर काढू पाहतो मात्र त्याच्या उद्योगांचा कहर झाल्यावर त्यालाच रुग्णालयात दाखल करावे लागते.

संध्याचे (सुरभी फडणीस) किरण बरोबरचे (किरण नेवाळकर) संबंध तिचा गुंड भाऊ पक्याभाईला (अमीर तडवळकर) पसंत नसतात. तो किरणच्या घरी धमकावून जातो. मारुतात्मजला पक्याभाई धमकावतो. पक्याभाईला दोन गुंड मारुतात्मजच्या सुपरपॉवरबद्दल सांगतात. मारुतात्मज सुपरहिरोसिंड्रोम या विकाराने ग्रासल्याने तशाच कपडय़ात अभिनिवेषात सतत वावरत असतो. लोकांना संकटमुक्त करण्यासाठीच आपण आहोत, अशी त्याची धारणा असते. मात्र त्याच्या उद्योगांमुळे मोठा भाऊ सुहास (गणेश जाधव), वहिनी (श्वेता घरत) आणि धाकटा भाऊ किरण बेजार झालेत. किरणचे संध्या या प्रेयसीशी लग्न लावून मारुतात्मजची जबाबदारी त्याच्यावर टाकून दुसरीकडे राहायला जाण्याची योजना वहिनीची असते. हा प्रकार मारुतात्मजला समजताच वीजवाहू उघडय़ा बटणाला हात लावून तो स्वतःला संपविण्याचा प्रयत्न करतो. पक्याभाईच्या अड्डय़ावर समेटाची बोलणी करायलाही तो मागे-पुढे पाहत नाही. यातूनच निर्माण झालेली धम्माल म्हणजे विनोदाची पर्वणीच रसिकांना पाहायला मिळते.

सिद्धार्थ जाधवने त्याच्या स्वतःच्या शैलीत मारुतात्मज मोठय़ा झोकात उभा केला आहे. धुमाकूळ घालावा, तसा तो रंगमंचावर विलक्षण सहजतेने वावरतो. नाटकाचा केंद्रबिंदू म्हणून तो यशस्वी ठरलाय. सुपरपॉवरची व्यक्तिरेखा रंगमंचीय सादरीकरण करताना सुपरहिरो वास्तवात नाही, याची जाणीव सतत प्रेक्षकाला करून देण्यात केदार शिंदे मागे पडलेले नाहीत. इतर पात्रांनीही साजेशी साथ दिल्याने नाटक संस्मरणीय ठरते. नाटकातील काव्य, कोरिओग्राफी सादरीकरणाला हातभार लावते. शीतल तळपदेंची प्रकाश योजना व प्रदीप मुळये यांचे नेपथ्य, साई-पियुष यांचे संगीत नाटकाला उंची मिळवून देते. कोणताही विचार न करता टेन्शन फ्री धम्माल मेजवानी ठरावी, असे हे नाटक आहे.

शनिवार, 18 रोजी कुडाळ येथे, तर रविवार, 19 रोजी सावंतवाडी येथे हे नाटक सादर होणार आहे.