|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बीपीएल कार्ड अर्जासाठी 50 रुपयेच द्यावेत

बीपीएल कार्ड अर्जासाठी 50 रुपयेच द्यावेत 

प्रतिनिधी / बेळगाव

बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज करताना अर्जधारकांनी 50 रुपयेच द्यावेत, यापेक्षा अधिक पैशांची मागणी होत असल्यास अर्जदारांनी संबंधितांविरुद्ध तक्रार करावी. बीपीएल कार्डे मिळवून देण्यासाठी एजंट पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे नागरिकांनी कोणालाही पैसे देऊन आपली फसगत करून घेऊ नये, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या उपसंचालिका अफरीन बानो बळ्ळारी यांनी केले आहे.

सध्या एपीएल व बीपीएल रेशनकार्डांसाठी ऑनलाईनद्वारे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू आहे. यामुळे शहर व परिसरातील विविध सेवा केंद्रांवर नवीन रेशनकार्डासाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यामध्ये बीपीएल रेशनकार्डासाठी असंख्य अर्ज दाखल करण्यात येत आहेत. याचाच गैरफायदा घेत काही एजंटांनी अर्जधारकांना हेरून बीपीएल कार्ड मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यास सुरुवात केली आहे. याची गंभीर दखल खात्याच्या उपसंचालिका बळ्ळारी यांनी घेतली आहे. तसेच कोणालाही पैसे न देण्याचे आवाहन केले आहे.

       पात्र अर्जधारकांना पोस्टाद्वारे घरपोच रेशनकार्डे

बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्या पात्र अर्जधारकांना पोस्टाद्वारे घरपोच नवीन रेशनकार्डे पोहोचविण्यात येणार आहेत. मात्र यासाठी अर्जधारकांची आर्थिक परिस्थिती आणि सदर अर्जधारक बीपीएल रेशनकार्डासाठी खरोखरच पात्र आहेत का, याची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच पात्र नागरिकांना बीपीएल रेशनकार्ड घरपोच पोहोचविण्यात येईल, असे अफरीन बानो बळ्ळारी यांनी कळविले आहे.

बॉक्स करणे

         आधार लिंकसाठी 31 मार्चपर्यंत मुदत

रेशन कार्डधारकांना आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले होते, तरीही असंख्य कार्डधारकांनी अजूनही आधार क्रमांक लिंक केले नाहीत. यामुळे अशा बीपीएल रेशन कार्डधारकांचे रेशन स्थगित करण्यात आले आहे. फेब्रुवारीतील रेशनही त्यांना मिळणार नसल्याचे बळ्ळारी यांनी सांगितले आहे. आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत असून कार्डधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही केले आहे.