|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवचरित्राचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा

शिवचरित्राचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांची औद्योगिक, शेतीविषयक आत्मीयता,  कर्जविषयक, जलव्यवस्थापन एकूनच रयतेविषयीचे धोरण आचरणात आणून कृती केली पाहिजे. यासाठी शिवचरित्राचा कित्ता गिरवला तरच देशात उद्योजकता येईल.  छत्रपती शिवरायांच्या आदर्श कारभाराचा धडा राज्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवचरित्र व्याख्याते डॉ. केदार फाळके यांनी केले.

शिवजयंतीचे औचित्य साधून असेब्ल रोडवर ‘स्वराज्य सामाजिक संस्थे’च्या उद्घाटनप्रसंगी रविवारी आयोजित कार्यक्रमात तें प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सागर घोरपडे  होते. लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. याचवेळी संस्थेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. स्वरा सुतार ही  ताराराणीच्या तर भूमी सुतार भारतमातेच्या वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.  या दोन्ही चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

डॉ. फाळके म्हणाले, शिवाजी महाराजांमधील निष्कलंक चारित्र्य, अफाट धाडस,  व्यवस्थापन, नियोजन आणि कर्तव्य या गोष्टी सध्याच्या राज्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला. शिवाजी महाराज प्रजेचे रक्षण करणे हे आद्यकर्तव्य मानायचे. काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक असून, याकडे पाहिलात तर डोळे काढीन, असे म्हणणारा राज्यकर्ता निर्माण होण्याची गरज आहे.  शेतकऱयांना जमिन, अवजारे, बैलजोडी, अन्नधान्य दिली जात होती. धान्याच्या स्वरूपात कर्जाची परतफेड केली जायची. सध्या स्वस्त धान्य दुकानाचे धान्य बंद करून सरकार त्यापासून दारू निर्मिती करीत आहे. सध्याचे कर्जविषयक धोरण शेतकऱयांचा जीव घेणारे आहे. 21 व्या शतकातील शेतकऱयांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर छ.शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण अमलात आणण्याची गरज आहे. रयतेचा राजा एकदा बोलले की कोणी टिकाटिप्पणी करीत नव्हते, पण सध्याचे राज्यकर्ते बोलले की, त्यावर राजकीय टीका टिप्पणीला उधाण येते, हाच विरोधाभास आहे.

ते म्हणाले, रायगडावर, पन्हाळगडासह सर्वच गडांवर शिवाजी महाराजांनी केलेल्या जल व्यवस्थापनाचा अभ्यास करून पाणी व्यवस्थापन केले तर दुष्काळाला तोंड द्यावे लागणार नाही. पाणी व्यवस्थापनातील शिवरायांचा कित्ता सध्याच्या सरकारने गिरवला नाही तर येत्या 50 वर्षात देशाचे रूपांतर वाळवंटात होईल. भविष्य निर्वाह निधी म्हणून त्याकाळी शिवाजी महाराजांनी मोठी तरतूद केली होती. सध्या भविष्यनिर्वाह निधीच्या गप्पा मारणारे काहीच करीत नाहीत. शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेचा अर्थदेखील लोकांना आजतागायत समजलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

धनंजय नामजोशी यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त स्वप्नील नाईकवडी, सहकार अधिकारी दिपाली चौगुले, नगरभूमापन अधिकारी सुवर्णा पाटील, अध्यक्ष सागर घोरपडे.

दिल्ली जिंकण्याची ध्येय मराठयांनी कायम ठेवले पाहिजे

मराठयांचे अजूनपर्यंत दिल्ली जिंकण्याचे ध्येय पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दिल्ली जिंकण्याचे ध्येय कायम ठेवून दिल्ली गाठण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे, असे फाळके यांनी स्पष्ट केले.

Related posts: