|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेस्कॉमची बेपर्वाई शेतकऱयांसाठी धोकादायक

हेस्कॉमची बेपर्वाई शेतकऱयांसाठी धोकादायक 

वार्ताहर/ निपाणी

निपाणीसह ग्रामीण भाग हा शेतीप्रधान परिसर म्हणून ओळखला जातो. पारंपारिक पद्धतीने तंबाखू उत्पादन घेतले जाणाऱया या परिसरात पाणी सुविधेमुळे शेती व्यवसायात प्रगती होऊ लागली आहे. तंबाखूला पर्याय म्हणून ऊस, केळी अशा पिकांसह फळ व भाजीपाल्यांचे उत्पादन घेण्याकडे कल वाढू लागला आहे. असे असताना हेस्कॉमकडून मात्र शेतकऱयांना योग्य त्या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. शेत-शिवारातून असणाऱया वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, जागा बदल करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे हेस्कॉमची बेपर्वाई शेतकऱयांसाठी धोकादायक ठरू लागली आहे.

नांगनूर बारभाई येथे पाटील यांच्या शेतजमिनीत असणारा ट्रान्सफॉर्मर गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक बनला आहे. या ट्रान्सफॉर्मरला जोडण्यात आलेल्या वीज वाहिन्याही हाताच्या अंतरावर लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱया वीज वाहिन्या आणि धोकादायक बनलेला ट्रान्सफॉर्मर यातून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे पाटील यांच्या दोन क्षेत्रात असणाऱया ऊस पिकासह पालाकुट्टी, खत याचे नुकसान झाले. घडलेली ही घटना हेस्कॉमच्या बेपर्वाईचे फलित असल्याने शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. झालेल्या नुकसानीला आता जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पुढे येऊ लागला आहे.

पाटील यांच्या शेत जमिनीसह शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती दिसून येते. शेतकरी याकडे गांभीर्याने लक्ष देताना हेस्कॉम अधिकारी व कर्मचाऱयांना यासंबंधीची माहितीही देतो. पण हेस्कॉम अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे गांभीर्याने न पाहता दुरुस्तीला महत्त्व देत नाहीत. यातून मग आगीच्या घटना घडताना शेतकऱयांना नुकसानीला सामोरे जावे लागते. जर शेतकऱयांनी शेतशिवारातील वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व बदलाची मागणी केली असता तुम्हाला सरकार मोफत वीज देते, दुरुस्तीचा खर्च परवडणारा नाही. जर दुरुस्ती करून घ्यायची असेल तर पैसे मोजावे लागतील असा कांगावा अधिकारी व कर्मचारी करताना दिसतात.

खासगीकरणाने काय साधले?

शहर व ग्रामीण भागात निर्माण झालेली ही परिस्थिती पूर्वीची सरकारी व्यवस्था होती तीच बरी होती, खासगीकरणाने काय साधले? असे सवाल व्यक्त करण्यास पूरक ठरत आहेत. हेस्कॉमचे अनेक कर्मचारी अधिकाऱयांच्या वरदहस्ताखाली शेतकरीवर्गाची पिळवणूक करू लागले आहेत. काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेपातून बेकायदा जोडण्या दिल्या जात आहेत. अशा जोडण्या देताना पुढे होणारा धोका विचारात घेतला जात नाही. ज्यावेळी धोका होतो त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांची बदली झालेली असते. त्या बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱयांना याविषयी जबाबदार धरताना अनेकजण स्वतःवरील जबाबदारी बाजूला करताना दिसतात.

दुरुस्तीकडे दुर्लक्ष, वसुलीत आघाडी

विहीर, नदी, कूपनलिका, ओढा अशा ठिकाणी असणारे ट्रान्सफॉर्मर कमी क्षमता असतानाही अधिक भार देऊन चालवले जात आहेत. अशावेळी नव्या जोडण्यांना संबंधित शेतकऱयांनी विरोध दर्शविल्यास अर्थपूर्ण वाटाघाटीतून याकडे दुर्लक्ष केले जाते. एकीकडे हेस्कॉम वीज बिले वसूल करण्यात आघाडी घेत आहे पण तेच दुसरीकडे दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. यातून हेस्कॉमचा फक्त इनकमिंगचा उद्देश स्पष्ट होत असून आऊटगोईंग होण्याला मात्र ब्रेक लावला जात आहे.