|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कन्नड-उर्दू गटाला महापौरपद देणाऱया गटाला पाठिंबा

कन्नड-उर्दू गटाला महापौरपद देणाऱया गटाला पाठिंबा 

सत्ताधारी-समविचारी आघाडीची गोची : मराठी नगरसेवकांचा कोणता गट कन्नड-उर्दू महापौराला पाठिंबा देणार?

प्रतिनिधी/ बेळगाव

महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या हालचालांना प्रारंभ झाला असून सत्ताधारी गटातील दुफळीचा फायदा घेण्यासाठी बैठकांना वेग आला आहे. महापौरपद कन्नड-उर्दू गटाला देण्याऱयांना पाठिंबा देण्याची तयारी विरोधी गटाने दर्शविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे सत्ताधारी गटातील 22 आणि समविचारी आघाडीची गोची झाली असून मराठी भाषिक नगरसेवकाची महापौरपदी कशी निवड होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

 समविचारी गटाने स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यासाठी महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांची नावे जाहीर केली आहेत. मात्र सत्ताधारी गटातील नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याने दोन्ही गटातील दरी वाढत चालली आहे. 22 नगरसेवकांनी पाठिंबा नाही दिला तरी निवडणूक लढविणारच अशी आडमुठी भूमिका समविचारी गटप्रमुखांनी घेतली आहे. समविचारी गटातील नगरसेवकांनी विश्वासात न घेता उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असल्याने सत्ताधारी गटाने निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी अद्याप बैठक घेतली नाही. सत्ताधारी गटातील नगरसेवकांमध्ये निर्माण झालेल्या दुफळीचा फायदा घेण्याची तयारी विरोधी गटातील नगरसेवकांनी चालविली आहे.

 सत्ताधारी आणि समविचारी गटाला पाठिंबा देऊ पण महापौरपद कन्नड-उर्दु गटाला हवे, अशी भूमिका कन्नड-उर्दू गटाने घेतली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या कन्नड-उर्दू गटाचे संख्याबळ 25 आहे. यामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. मात्र महापौरपद मिळाल्यास एकत्रित येण्याची तयारी दर्शविली आहे. महापौरपद दिल्यास समविचारी गट किंवा सत्ताधारी गटातील 22 नगरसेवक या दोन्हींपैकी कोणत्याही गटाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. कन्नड-उर्दु गटाची संख्या जास्त असल्याने महापौरपद आम्हाला मिळणे आवश्यक आहे. यामुळे दोन्हींपैकी कोणत्याही गटाने महापौरपद दिल्यास त्यांना पाठिंबा देऊ अशी प्रतिक्रिया विरोधी गटनेते रवि धोत्रे यांनी बोलताना दिली. यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांचा कोणता गट कन्नड-उर्दू गटाला महापौरपद देणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आपले मतभेद बाजूला ठेवून महापौर-उपमहापौर निवडणुकीत एकी दाखवावी अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. महापौरपद विरोधी गटाला देऊन अस्मिता गहाण ठेवण्याऐवजी मराठी गटातील नगरसेवकांनी एकत्रित येऊन गटातील मतभेद संपविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मराठी भाषिक नागरिकांमधून होत आहे.

आपल्या गटाचे उमेदवार निवडणूक लढविणारच अशी आडमुठी भूमिका समविचारी गटाने घेतली आहे. यामुळे सत्ताधारी गटातील 22 नगरसेवकांनी बैठक घेतली नाही. समविचारी गटाने तडजोडीची भाषा न केल्यास तटस्थ राहण्याची भूमिका सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या चर्चेनंतर घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आमदार संभाजी पाटील यांनी वृत्तपत्रांना दिली आहे. यामुळे महापालिकेत कोणत्या  गटाचा महापौर-उपमहापौर होणार या बाबतच्या चर्चांना शहरात ऊत आला आहे.

Related posts: