|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रशिया बनला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश

रशिया बनला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश 

वृत्तसंस्था/ मॉस्को

डिसेंबर 2016 मध्ये रशिया कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. सौदी अरेबियाला मागे टाकून त्याने हे स्थान मिळविले आहे. रशिया आणि सौदी समवेत अनेक तेल उत्पादक देश नोव्हेंबर 2016 मध्ये तेल उत्पादनाची मर्यादा कमी करण्यावर सहमत झाले होते.

 डिसेंबर महिन्यात रशियाने प्रतिदिन 10.49 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन केले. नोव्हेंबरच्या तुलनेत हे प्रमाण प्रतिदिन 29000 बॅरलने कमी होते. सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन 10.72 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करत होता, तर डिसेंबरमध्ये हे प्रमाण कमी करत 10.46 दशलक्ष बॅरलवर आणले गेले.

वेबसाइट ऑफ जॉइंट ऑर्गनायजेशन्स डाटा इनिशटिव्हद्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मार्च 2016 पासून पहिल्यांदाच रशियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात सौदीवर आघाडी घेतली आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांनी नोव्हेंबरमध्ये जानेवारी 2017 पासून आगामी 6 महिन्यांपर्यंत तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला होता. सौदीने या प्रस्तावावर अधिक जोर दिला होता.

रशियासहित असे उत्पादक देश जे या समूहाचे सदस्य नाहीत, त्यांनी देखील या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या प्रस्तावामुळेच नोव्हेंबर अखेरपासून आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अमेरिका कच्च्या तेलाच्या उत्पादकांमध्ये तिसऱया स्थानावर आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत प्रतिदिन 8.9 दशलक्ष बॅरल कच्चे तेलाचे उत्पादन होत होते. तर डिसेंबरमध्ये त्याने हे प्रमाण कमी करत 8.8 दशलक्ष बॅरलवर आणले आहे. सौदीची कच्च्या तेलाची निर्यात कमी होत प्रतिदिन 80 लाख बॅरलवर आली आहे.