|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूणचा सुधारित शहरविकास आराखडा प्रसिद्ध

चिपळूणचा सुधारित शहरविकास आराखडा प्रसिद्ध 

प्रतिनिधी / चिपळूण

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला येथील शहरविकास आराखडय़ाचा सुधारित नकाशा बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला असून या नकाशाची संक्षिप्त अहवाल येत्या दोन दिवसांत सादर केला जाणार आहे. या आराखडय़ात इमारती व घरांवरील आरक्षणे हटवल्याने येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील जुन्या इमारती व घरांवर पडलेले आरक्षण, प्रत्यक्ष जागेवर पाहणी करता तयार केलेला नकाशा, गर्दीच्या वस्तीतील रस्त्यांचे रूंदीकरण व नकाशाचा प्रारूप आराखडा सादर न केल्याने वादग्रस्त बनलेल्या शहरविकास आराखडय़ाविषयी अखेर तोडगा काढण्यात आला आहे. या आराखडय़ातील तब्बल 67 आरक्षणे रद्द करण्यात आली असून त्याचा सुधारित आराखडा बुधवारपासून नगर परिषदेत उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र या आराखडय़ाविषयी सविस्तर माहिती असलेला संक्षिप्त अहवाल दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

सुरूवातीला या शहर आराखडय़ाविषयी लावण्यात आलेली सुनावणी येथील नागरिकांनी फेटाळून लावली होती. मात्र त्यानंतर पुन्हा सुनावणी घेऊन ज्या इमारती व घरांवर आरक्षणे पडली आहेत, त्याचा गांभीर्याने विचार करून या सुधारित आराखडय़ात फेरबदल करण्यात आला. मात्र खुल्या जागेत जी आरक्षणे टाकण्यात आली होती, ती जसे थै स्थितीत असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

जनतेला दिलेला शब्द पाळला- सौ. खेराडे

याविषयी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी बोलताना सांगितले की, शहरविकास आराखडय़ाविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. मात्र सुनावणीनंतर या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन ज्या घरांवर व इमारतींवर आरक्षणे पडली होती ती रद्द करण्याबाबत शब्द देण्यात आला होता. त्याप्रमाणे या सुधारित आराखडय़ात बदल करण्यात आला आहे. मात्र खुल्या जागेतील आरक्षणे कायम असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.