|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पार्किंगबाबत मनपा अपयशी, रहदारी पोलीसांकडून दंडाचा भुर्दंड

पार्किंगबाबत मनपा अपयशी, रहदारी पोलीसांकडून दंडाचा भुर्दंड 

प्रतिनिधी /बेळगाव :

शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वाहतूकीमधील अडथळे दुर करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला आहे. पार्किगसाठी तळघरातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. ऐनवेळी कारवाई रद्द करण्यात आली आहे. यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनधारक अस्ताव्यस्तपणे वाहने थांबवित आहेत. मात्र थांबणाऱया वाहनावर कारवाई करण्याचा सपाटा रहदारी पोलीस खात्याने चालविला आहे. यामुळे वाहने कुठे पार्क करायची अशी समस्या भेडसावत आहे.

 बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि पार्किग समस्या भेडसावत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच फेरीवाल्याची  गर्दी वाढत चालली असल्याने पादचाऱयांनादेखील समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे या समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने बाजारपेठेतील विविध रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला. यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. अतिक्रमणे हटवून पार्किगसाठीदेखील व्यवस्था करून वाहनधारकांना शिस्त लावण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले होते. याकरिता शहरातील तळघरातील अतिक्रमणे हटवून पार्किग सुविधा उपलब्ध करण्यात येईल असे सागितले होते. यानुसार तळघर मालकांना पंधरा दिवसाची मुदत देवून तळघरे रिकामी करण्याचा इशारा दिला होता. मात्र तळघरमालकांनी कारवाईला आक्षेप घेऊन जिल्हापालकमंत्र्याना निवेदन स्विकारून आयुक्तांशी चर्चा करण्याची सुचना केली होती. मात्र यानंतर ही कारवाई राबविण्याचा निर्णय आयुक्तांनी मागे घेवून तळघराचे पुन्हा सर्वेक्षण करून कारवाई
करण्यात येईल असे सागितले होते. मात्र सध्या सर्वेक्षणाची मोहित बारगळली आहे. यामुळे जिल्हापालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या सुचनेनुसार सदर कारवाई रद्द करण्यात आली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यामुळे तळघरे पार्पिंगसाठी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव बारगळला असून पार्किगची समस्या गंभीर बनली आहे. परिणामी वाहनधारक जागा उपलब्ध होईल त्याठिकाणी वाहने पार्क करीत आहेत. पण पार्क करणाऱया वाहनांवर रहदारी पोलीस खात्याकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. शंभर ते तीनशे रूपये दंड आकारण्यात येत असल्याने वाहनधारकांना आर्थिक भूर्दड सोसावा लागत आहे. तळघरे पार्किंगसाठी उपलब्ध करून दिल्यास वाहनधारकांना सोयीचे होवू शकते. पण याकडे महापालिका आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. 

Related posts: