|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगोल्यात आघाडी भक्कम तर महायुतीत भलताच सावळा गोंधळ

सांगोल्यात आघाडी भक्कम तर महायुतीत भलताच सावळा गोंधळ 

रवि साबळे/ सांगोला

            नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात पुन्हा एकदा शेकाप व राष्ट्रवादीच्या आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द करुन तालुक्यावर आपलीच पकड असल्याचे पुन्हा सिध्द केले. या निवडणुकीत आघाडीचे प्रमुख आ. गणपतराव देशमुख यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीची प्रचार यंत्रणा आपल्या हातात घेवुन संपुर्ण तालुका पिंजुन काढत जे विरोधक त्यांना वयावरुन बोलतात त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व मा. आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सुध्दा प्रचारत आघाडी घेत नियोजनात चांगली भागीदारी केली. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी सुध्दा महीला वर्गात चांगल्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळत महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापच्या कमी जागा विजयी झाल्या त्याचे खापर राष्ट्रवादीवर फोडण्यात आल्याची अंतर्गत चर्चा कार्यकर्त्यांमधुन झाली होती. परंतु यावेळेस मात्र दोघांनीही आघाडीचा धर्म तंतोतंत पाळल्याचे दिसुन आले. तरी सुध्दा आघाडीत असणाऱया शेकाप व राष्ट्रवादीची प्रत्येकी एक जागा महायुतीला गेल्याचे शल्य मात्र आघाडीच्या दोन्ही नेत्यांमध्ये दिसले. एखतपुर जिल्हा परिषद गटाच्या जागेवर निवडुन आलेले अतुल पवार यांचा विजय मात्र आघाडीच्या नेत्यांना फारच सलत आहे. कारण ती जागा स्वतः आ. गणपतराव देशमुख व दिपकआबा साळुंखे-पाटील यांची प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांना हा पराभव जिव्हारी लागल्याचे दिसते.

            तर दुसरीकडे तालुक्यात महायुतीचा गेंधळ मात्र तालुक्याने अगदी आवडीने बघितला. संपुर्ण निवडणुक काळात महायुतीमध्ये भलत्याच घडाघोडी झाल्या. राज्यात शिवसेना व भाजप युती तुटली असताना इथे मात्र युती कायम राहीली. जिल्हृयासह राज्यात शिवसेना एकाकी असताना तालुक्यात मात्र युतीचे नेतृत्व शिवसेना नेते मा.आ. शहाजीबापु पाटील यांनी केले. तर भाजपाच्यासोबत आरपीआय व राष्ट्रीय समाज पक्ष असताना इथे मात्र स्वतंत्र उमेदवार उभे करुन आघाडीच्या धर्माला गालबोट लावले. त्यामुळे महायुतीची अंतर्गत धुसपुस मात्र गावागावातल्या चौकात चर्चेचा विषय झाली. त्याचा फटका निवडणुक निकालावर झाला.

            महायुतीत असताना भाजपने ‘कमळ’ या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले होते. पण भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्यावर त्यांच्याच पक्षातले नेते नाराज असल्याने त्यांचे नेतृत्व पक्षात सुध्दा सर्वमान्य होत नाही. भाजपच्या चिन्हावर उभा केलेले उमेदवार जर महायुतीच्या चिन्हावर उभे असते तर  निवडणुकीचा निकाल निश्चितपणे वेगळा पहावयास मिळाला असता. त्याशिवाय महायुतीत असलेल्या आरपीआयने मध्येच महायुतीची साथ सोडली, तरीपण त्यांच्या उमेदवार विजयी झाला नाही. तसेच राष्ट्रीय समाज पक्षानेही महायुतीचा धर्म तोडुन आपले स्वतंत्र उमेदवार काही ठिकाणी उभे केले. या सर्व गोष्टीमुळे महायुतीमध्ये भलताच सावळागोंधळ दिसुन आला. एकीकडे शेकाप व राष्ट्रवादीची मजबुत आघाडी तर दुसरीकडे कमजोर महायुती असे चित्र पहावयास मिळाले. महायुतीच्या नेत्यांना एकीचा सुर शेवटपर्यंत राहीला.

            महायुतीचे जिल्हापरीषदेचे दोन व पंचायत समितीचे चार उमेदवार निवडुन आले. या विजयात युतीच्या नेत्यांचा फारसा प्रभाव नव्हता कारण त्या उमेदवारांनीच आपली स्वतःची प्रचारयंत्रणा अगोदर पासुनच राबविली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. तसेच महायुतीत यावेळी सामील झालेला घटक पक्ष काँग्रेस(आय) पक्षाला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. तालुक्यात काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षाला जनतेनी थारा दिला नसल्याचे चित्र या निवडणुकीत दिसुन आले आहे.

            एकंदरीत तालुक्यावर पुन्हा एकदा शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचेच वर्चस्व असल्याचे दिसुन आले. जिह्यासह राज्यात व देशात भाजपची लाट असतानासुध्दा सांगोल्यात मात्र आ. गणपतराव देशमुख व दिपकआबाची हवा आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले. येणाऱया निवडणुकीमध्ये जर महायुतीला आपले वजन वाढवायचे असेल तर त्यांनी अगोदर महायुतीचे नेतृत्व कोण करणार? यावर शिक्कामोर्तब करावे. कारण अत्यंत मोठी राजकीय महत्वकांक्षा असणारे नेते महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षात असल्यानेच खऱया अर्थाने महायुतीचे नुकसान झाले हे तितकेच सत्य आहे.

            काही झाले तर नेहमीप्रमाणे विकासाच्या मुद्यावर लढविलेल्या या निवडणुकांमध्ये आघाडीचा विजय तर महायुतीचा पराभव झाला असला तरी सुध्दा तालुक्यातील जनतेनी सर्वंच नेत्यांना भरपुर प्रेम दिलेले आहे. त्यामुळे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा राजकारण पण एरव्ही मात्र समाजकारण करण्यासाठी एकत्र याल ही तालुक्यातल्या जनतेची अपेक्षा असणार आहे. कारण राजकारणाची समीकरणे काळाच्या ओघात बदलताना दिसतात. त्यामुळे कोण विकास करणार, कोण त्यासाठी धडपडणार यावर जनता लक्ष ठेवुन आहे. कारण जनतेचा राजकीय अभ्यास आता कच्चा राहीलेला नाही. जनता खरोखर हुशार असुन लबाडांना इथुन पुढच्या राजकारणात थारा राहणार देणार नाही मग तो कुठल्याची पक्षांचा असो. त्यामुळे नेत्यांनो सावधान, जनता जनार्दन आहे कृपया दुर्लक्ष करु नये.

Related posts: