|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जि.पं.ची विकास आढावा बैठक सोमवारी

जि.पं.ची विकास आढावा बैठक सोमवारी 

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हा पंचायतची या वर्षीची विकास आढावा बैठक सोमवार दि. 27 रोजी बोलाविण्यात आली आहे. सकाळी 11 वा. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात बैठक होणार आहे. बैठकीत प्रामुख्याने पिण्याचे पाणी, ग्रामीण भागातील वीज भारनियमन, आरोग्य, रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आदी विषयांवर गांभीर्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.

 जि. पं. सीईओ रामचंद्रन आर. यांच्या उपस्थितीत आणि जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. नुकतीच कर्नाटक विकास कार्यक्रम (केडीपी) बैठक जिल्हा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीतही प्रामुख्याने जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थिती, पाणी समस्या, वीज टंचाई आदी ज्वलंत विषयांवर चर्चा झाली होती. संबंधित अधिकारी वर्गांना धारेवर धरण्यात आले होते. सोमवारी होणाऱया बैठकीतही हे ज्वलंत विषय जि. पं. सदस्य प्रामुख्याने मांडण्याची शक्यता आहे.

जि.पं.च्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी 2016-17 या आर्थिक वर्षात एकूण 780 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती मागील बैठकीत देण्यात आली होती. मात्र या अनुदानातून जिल्हय़ात किती विकासकामे राबविण्यात आली, या प्रश्नाचे उत्तर अधिकारीवर्गांना द्यावे लागणार आहे. जिल्हय़ात डेंग्यू व चिकुनगुनियाचे संशयित रुग्ण आढळून आले होते. यापैकी 118 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे मागील बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आप्पासाहेब नरट्टी यांनी सांगितले होते. सध्या स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे आरोग्य खात्याला गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. सोमवारी होणाऱया बैठकीत आरोग्य खात्याला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाली असून मागील बैठकीत या विषयावर आरोग्य खात्याला सूचना करण्यात आल्या होत्या. जि. पं. चे शिक्षण व स्थायिक समिती अध्यक्षांनी या विषयावर जिल्हा आरोग्य अधिकाऱयांना धारेवर धरले होते. जिल्हय़ात दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणी समस्येवर बैठकीत प्राधान्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.   

Related posts: