|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ईर्षा आणि मत्सर

ईर्षा आणि मत्सर 

मत्सर हा मानवी नातेसंबंधामधील एक सर्वसामान्य पण वैशिष्टय़पूर्ण असा अनुभव आहे. अगदी पाच महिन्यांच्या बालकापासून ते अतिवृद्ध व्यक्तींपर्यंत तो दिसून येतो. इतर अनेक वैशिष्टय़ांप्रमाणे मत्सरदेखील आपणास प्राणीजगतातून वारसाहक्काने मिळालेला दिसतो कारण तज्ञांनी केलेल्या एका प्रयोगानुसार माणूस जेव्हा कुत्र्यासारख्या दिसणाऱया खेळण्याकडे जास्त लक्ष देतो तेव्हा त्याने पाळलेल्या कुत्र्याच्या वागण्यात त्या खेळण्याविषयी मत्सर दिसून येतो.

माणसांमध्ये विविध परिस्थितींमध्ये विविध प्रकारचा मत्सर दिसून येत असला तरी लैंगिक संबंधांच्या संदर्भात त्यांच्या जीवनात तो अधिक ठळकपणे दिसून येतो. किंबहुना माणसाच्या मनातील मत्सर हा त्याच्यात दुसऱयाविषयी निर्माण झालेल्या लैगिंक आकर्षणाचा निदर्शक मानला जातो. स्त्रीपुरुषांच्या जोडप्यातील एक व्यक्ती तिसऱयाच कोण्या व्यक्तीकडे लैंगिकदृष्टय़ा आकर्षित होते तेव्हा त्या जोडप्यातील दुसऱया व्यक्तीच्या मनात मत्सराची भावना निर्माण होते. प्रत्यक्षात आकर्षित न होता केवळ आकर्षित झाले असण्याच्या संशयामुळेसुद्धा तितकाच तीव्र मत्सर जागृत होतो. जोडप्यातील प्रतारणा करणारी व्यक्ती आपल्या सहचरामध्ये लैंगिक मत्सर जागृत होईल या भीतीने त्याच्याशी खोटे बोलते. स्त्रियांमध्ये साधारणपणे लैगिंक कृत्यापेक्षा भावनिक गुंतवणुकीसंबंधीचा मत्सर अधिक प्रमाणात दिसून येतो.

मत्सरासंबंधी एक रोचक गोष्ट म्हणजे मत्सराचा रंग. माणूस रागाने लाल होतो, भीतीने काळवंडतो तसा मत्सराने तो हिरवा होतो असे मानले जाते. शेक्सपियरने आपल्या ऑथेल्लो नावाच्या नाटकात मत्सराला हिरव्या डोळय़ांचा राक्षस म्हटले आहे. सुप्रसिद्ध इंग्लिश लेखक व कवी चॉसर आणि ओव्हिड यांनीही मत्सर व ईर्ष्या यांना हिरव्या रंगाचे म्हटले आहे. प्राचीन ग्रीसमध्ये मत्सरचा संबंध शरीरातील वाढलेल्या पित्ताशी जोडण्यात येत असे. पित्तामुळे त्वचा काहीशी हिरवट दिसते. म्हणून तेव्हापासून मत्सराचा रंग हिरवा मानण्यात येऊ लागला असावा.

मत्सर आणि ईर्ष्या हे समानार्थी शब्दांसारखे वापरले जात असले तरी तज्ञांच्या मते त्यात थोडा फरक आहे. मत्सरामध्ये व्यक्ती स्वतःकडे नसलेली पण स्वतःला आवडलेली गोष्ट मिळवू इच्छिते. उदाहरणार्थ आईवडील जेव्हा आपल्या छोटय़ा बाळाचे अधिक कौतुक करतात तेव्हा त्यांच्या मोठय़ा मुलाला त्याचा मत्सर वाटू शकतो. तोच मोठा मुलगा आपल्या मित्राकडे असलेल्या नव्या सायकलीमुळे त्याची ईर्ष्या करतो. मत्सरी व्यक्तीला स्वतःचे एक महत्त्वपूर्ण नाते हरविण्याची अथवा त्यात वाईट प्रकारे बदल घडून येण्याची भीती वाटत असते. परंतु ईर्ष्या करणाऱया व्यक्तीकडे हवीशी वाटणारी मौल्यवान वस्तू नसते व तीच मिळवण्यासाठी तो इरेला पेटलेला असतो. आणि इरेला पेटलेली माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात.

मानसशास्त्रज्ञांनी मत्सर आणि ईर्ष्येमध्ये दिसून येणाऱया वेगवेगळय़ा भावना व विचार यांचा खूप अभ्यास केला. त्यानुसार मत्सराच्या सर्वसामान्य अनुभवामध्ये बहुतेक लोकात नुकसान होण्याची भीती, विश्वासघातासंबंधी संशय किंवा राग, स्वाभिमानाचा अभाव व नुकसान झाल्याचे दु:ख, अनिश्चितता व एकाकीपणा, महत्त्वाची व्यक्ती दुसऱयाकडे आकर्षित होण्याची भीती, अविश्वास यासारख्या विचारांचा व भावनांचा समावेश दिसून येतो तर ईर्ष्येच्या अनुभवामध्ये न्यूनगंडाची भावना, हुरहुर, परिस्थितीचा संताप, ईर्ष्या केलेल्या व्यक्तीसंबंधी दुर्भावना व त्यासोबत येणारी अपराधीपणाची भावना, सुधारण्याची प्रेरणा, प्रतिस्पर्धातील आकर्षक गुण मिळवण्याची इच्छा, भावनांची नापसंती इत्यादी विचारांचा व भावनांचा अंतर्भाव असतो. तज्ञांच्या मते ईर्ष्या आणि मत्सर एकाच वेळी अनुभवाला येऊ शकतात. किंबहुना प्रतिस्पर्ध्याविषयीची ईर्ष्येची भावना मत्सराचा अनुभव तीव्रतर करते. मनुष्य ईर्ष्या आणि मत्सर यासारख्या विघटनकारी व माणसामाणसात फूट पाडणाऱया मानसशास्त्रीय घटकांपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो का? त्यासाठी आपणास आपल्या आतील या घटकांचे स्वरूप समजावून घ्यावे लागेल.

आपल्याला हवीहवीशी वाटणारी एखादी गोष्ट जेव्हा दुसऱया व्यक्तीला मिळते, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा हेवा वाटू लागतो. त्यात काय मोठे, मीसुद्धा ती गोष्ट मिळवू शकतो असे म्हणून आपण त्या व्यक्तीची ईर्ष्या करू लागतो. तेव्हा खूप खटाटोप करूनही ती वस्तू आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपल्या मनात त्या व्यक्तीसंबंधी असूया निर्माण होते व आपण त्या व्यक्तीचा मत्सर करू लागतो. आपण स्वतःला दुसऱयापेक्षा अधिक हुषार, अधिक कार्यक्षम समजत असतो, आणि तरीही आपल्याला हवी असलेली संधी, पद जेव्हा दुसऱयाला मिळते तेव्हा आपल्या मनात त्याविषयी मत्सर निर्माण होतो.

ईर्ष्या आणि मत्सर यांच्या मुळाशी जाऊन शोध घेतला तर मानसशास्त्रीय तुलना हे त्यांचे मूलभूत कारण असल्याचे दिसून येते. मनुष्य सातत्याने स्वतःची इतरांशी तुलना करत असतो व त्यानुसार स्वतःला श्रे÷ अथवा कनि÷ ठरवत असतो. घरात व शाळेत एका मुलाची दुसऱया मुलाबरोबर तुलना केली जाते व त्यानुसार तो हुशार, की मठ्ठ हे ठरवले जाते. परंतु मूल हे तर आहे तसेच असते, तुलनेमुळे त्याच्यात काहीही बदल झालेला नसतो. फक्त तुलना करणाऱयाचा दृष्टिकोन बदललेला असतो. भौतिक गोष्टींच्याबाबतीत तुलना अपरिहार्य आहे. जेव्हा आपल्याला एखादी वस्तू विकत घ्यायची असते तेव्हा बाजारात उपलब्ध असलेल्या तशा प्रकारच्या सर्व वस्तूंची तुलना करून त्यातली कोणती वस्तू घ्यायची ते आपण ठरवत असतो. या ठिकाणी तुलना ही योग्यच आहे. परंतु मानसशास्त्रीय पातळीवर तुलनेची काय आवश्यकता आहे?

मनुष्य सातत्याने काही न काही बनण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला आहे त्यापेक्षा अधिक चांगले, अधिक मोठे, अधिक यशस्वी व्हायचे असते व स्वतःची इतरांशी तुलना करून तो त्याचे मोजमाप करत असतो. भौतिक पातळीवर बनण्याची प्रक्रिया ही रास्त आहे. एखाद्याला डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, इत्यादी व्हायचे असते व त्याप्रमाणे शिक्षण घेऊन तो ते ते बनत असतो. परंतु एखादा हिंसक मनुष्य जेव्हा अहिंसक बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो खरेच क्रमशः अधिकाधिक अहिंसक बनत जातो का? माणसाला येणारा क्रोध क्रमशः कमी करत त्यापासून मुक्त होता येते का? मानसशास्त्रीय पातळीवर काहीतरी बनण्याची प्रक्रिया हा एक भ्रम आहे व तुलना हा भ्रम कायम ठेवण्यास मदत करत असते. प्रत्यक्षात मनुष्य आहे तसाच हिंसक, रागीट असतो, पण मानसशास्त्रीय तुलनेमुळे आपण दिवसेंदिवस अधिकाधिक अहिंसक, शांत होत आहोत असा आभास त्याच्यात निर्माण होतो. अहिंसक बनण्यापेक्षा, माणसाने त्याच्यातील हिंसकतेची कारणे शोधून ती संपवली तर हिंसकतेचा खरा अंत होऊ शकतो. मनुष्य जेव्हा कोणत्याही प्रकारे मानसशास्त्रीय तुलना न करता जगू लागतो तेव्हा तो ईर्ष्या आणि मत्सर यापासून मुक्त असतो.